कोल्हापूर : कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी अंदुरे, बद्दीसह मिस्किनला न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या तिघांना जिल्हा न्यायालयाने 4 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या तिघांना जिल्हा न्यायालयाने 4 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास यंत्रणेकडून तपासाबाबतचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला जाईल, असे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले. दरम्यान पहिला संशयित समीर गायकवाड याच्यावर चार्जफ्रेम दाखल करण्याबाबतची पुढील सुनावणी न्यायालयाने 7 ऑक्‍टोबरला ठेवली.

पानसरे हत्येप्रकरणी कोल्हापूर एसआयटीने संशयित सचिन प्रकाशराव अंदुरे (वय 32, रा. औरंगाबाद) अमित रामचंद्र बद्दी (वय 29, रा. हुबळी) आणि गणेश दशरथ मिस्किन (वय 30, रा. हुबळी) या तिघांना 6 सप्टेंबरला अटक केली होती. संशयित अंदुरेचा पुणे सीबीआयकडून तर मिस्किन व बद्दी या दोघांचा राष्ट्रीय तपास यंत्रणा मुंबईतून ताबा घेण्यात आला होता.

तपास यंत्रणेने कोल्हापूरचा लेखकासह दोन विचारवंताची रेकी संशयित अंदुरेसह पाच जणांनी केली असल्याचा दावा न्यायालयात केला होता. न्यायालयाने त्या तिघांना पहिल्या टप्प्यात 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. यानंतर पुन्हा न्यायालयाने त्या तिघांना चार दिवसांची अशी एकूण 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. आज दुपारी त्या तिघांना तपास यंत्रणनेने नववे सह दिवाणी न्यायाधीश एस. एस. राउळ यांच्या न्यायालयासमोर सादर केले. यात तपास यंत्रणनेने त्या तिघांना 14 दिवसाची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी केली. न्यायालयाने त्या तिघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. हा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली असल्याने तपासाचा अहवाल तपास यंत्रणा उच्च न्यायालयात सादर करेल असे विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी सांगितले. 

दरम्यान, या प्रकरणातील पहिला संशयित समीर गायकवाड याच्यावरील चार्जफ्रेमबाबतची सुनावणी आज जिल्हा न्यायालयात होती. त्यासाठी समीर न्यायालयात हजर होता. मात्र उच्च न्यायालयात याबाबत दाखल केलेल्या आव्हान याचिकेची पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे याबाबतची जिल्हा न्यायालयातील पुढील सुनावणी 7 ऑक्‍टोबरला ठेवण्यात आली असल्याचे समीरचे वकील समीर पटवर्धन यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin andure ganesh Miskin judicial Custody for comrade Pansare Murder Case