सचिन तेंडुलरकरचा षटकार... सदाभाऊ खोतांच्या लेखणीला आली धार 

tendulkar-khot
tendulkar-khot

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रेहानाचे ट्‌वीट आणि त्याला भारतीय सेलिब्रेटींनी दिलेले उत्तर हा विषय गाजतो आहे. त्यात भारताचे महान माजी क्रिकेटपटू आणि माजी खासदार सचिन तेंडूलकर यांनी रेहानाच्या ट्‌विटला उत्तर देताना "भारतीय सार्वभौमत्वाचा' उल्लेख केला आहे. त्या मुद्यावरून शेतकरी कायद्याचे समर्थक सचिनच्या समर्थनात तर विरोधक सचिनच्या विरोधात मैदानात उतरून बॅटिंग करत आहेत. त्यात आज माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांचे नाव जोडले गेले. सदाभाऊंनी फेसबूकच्या माध्यमातून सचिन तेंडूलकरचे समर्थन केले आहे. त्यांचा लेख फेसबूक वॉलवर झळकला आहे. त्याचा संक्षिप्त भाग... 
------------ 
सचिन तेंडुलकर यांचा षटकार... 
परदेशी सेलिब्रिटींची ठिगळे... 
आणि घायाळ मतलबी नेते सगळे... 
काही दिवस शांततेने सुरू असलेल्या दिल्लीतील आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसाचाराचे गालबोट लागले. रस्त्यावर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी उभ्या असलेल्या पोलीसांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालून त्यांना जीवे मारण्याचा माथेफिरूपणा काही लोकांनी केला. इतकेच नव्हे तर प्रजासत्ताकाच्या पवित्र दिवशी अनेक जण झुंडीने लाल किल्ल्यावर घुसले आणि आपले धार्मिक निशाण तिरंग्याच्या शेजारी लावण्याचे राष्ट्रद्रोही कृत्य केले. सारा देश प्रजासत्ताक दिनाची झालेली विटंबना पाहून हळहळत होता. आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. गेली अनेक वर्षे चळवळीत मी तो हक्क बजावत आलो आहे, पण प्रजासत्ताक दिनी घडलेला प्रकार अभूतपूर्व होता. ते आंदोलन नव्हते तर पूर्वनियोजित घातलेला धुडगूस होता. कृषी कायद्याच्या विरोधात सुरूवातीला काहीसे प्रामाणिकपणे चाललंय असे वाटणारे आंदोलन दिवसागणिक दिशाहीन होत गेले. अनेक दिवस चाललेल्या चर्चेतून तीन कायद्याबाबत सरकार सुधारणेची लवचिक भूमिका घेत असताना तथाकथित अधिक शेतकरी नेते ताठर भूमिका घेवू लागले. यावरून या आंदोलनाच्या आड लपलेले राजकारण उघड झाले. 
इंग्लिश गाणं गाणारी पॉप स्टार रेहाना हीचे या आंदोलनावरील ट्‌वीट वजा भाष्य हा राजकारणाचाच एक भाग आहे. सुरुवातीला मला वाटले रेहाना ही कोणीतरी आंतरराष्ट्रीय ख्यातीची अर्थशास्त्रज्ञ आहे की काय? तिनं भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली आहे, म्हणजे निश्‍चितच तिच्याकडे शेतकरी प्रश्नाविषयी काही तरी भलेबुरे विचार असतील. मी माध्यम चाळली तर ती चक्क इंग्लिश गाणी गाणारी गायिका निघाली. ती कोट्यावधी रुपयांचा मालकीन आहे. फोर्ब्ज मासिकाने जगातील प्रभावशाली महिलात तिची निवड केली होती. फॅशन व्यवसायात हीच बऱ्यापैकी नाव आहे. आपल्या व्यस्त व्यवसायातून रीहानाला गाझीपूर सीमेवर बसलेला माझा शेतकरी भाऊ दिसला, हे बघून क्षणभर मला तीचं कवतुक वाटलं. आपल्या कोट्यावधीच्या प्रचंड संपत्तीमधून ती काही कोटी रूपये आंदोलनाला मदत म्हणून पाठवते की काय असे वाटत असतानाच प्रसार माध्यमांनी बातमी दिली की दिल्ली आंदोलनावर दोन शब्द बोलायला या बयेने पैसे घेतले आहेत. 
शंका घ्यायला जागा आहे, कारण या आधी सामाजिक आंदोलनावर आपली बुध्दी पाजळल्याची उदाहरणे मला दिसली नाहीत. काही महिन्यांपूर्वी चीनचे सैनिक भारतीय भूमीचा लचका तोडण्यासाठी आत शिरले होते. तेंव्हा या घुसखोरी विरोधात तोंड उघडताना ती दिसली नाही. तैवान कित्येक वर्षे झाली स्वतंत्र राष्ट्र आहे, पण चीन त्याच्या स्वातंत्र्याला मान्यता द्यायला तयार नाही. हॉंगकॉंगचे नागरीक अनेक वर्षे चीनच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगायचे आहे. त्यासाठी तेथील लोक वरचेवर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असतात. त्यांच्याबद्दल रेहानाला कंठ फुटल्याचे कधी ऐकीवात आले नाही किंवा या दडपलेल्या जनतेसाठी घेतलेल्या एखाद्या चॅरीटी शोसाठी तिने नृत्य केल्याचे आढळले नाही..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com