सदाभाऊ-दिलीपतात्या भांडण निरर्थक - राजू शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांच्या भांडणात आज खासदार राजू शेट्टी यांनी मध्यस्थी केली. जिल्हा बॅंकांवरील आर्थिक निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे श्री. शेट्टी यांनी कबूल करत या प्रश्‍नावर अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचा शब्द दिलीप पाटील यांना दिला. त्याचवेळी सदाभाऊंनी जिल्हा बॅंकांतील भ्रष्टाचाराबद्दल केलेला आरोप वैयक्तिक न घेता आता भांडण थांबवा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.

"सदू, गावाकडं ये, तुला उसानं फोकळतो', अशा शब्दांत दिलीप पाटील यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर काल येथे सहकारी बॅंकांच्या मोर्चावेळी हल्लाबोल केला होता. सध्या नागपूर अधिवेशनात असलेल्या सदाभाऊंनी त्यावर एका शब्दाने प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. यामागे श्री. शेट्टी यांनी दिलेला सबुरीचा सल्लाच कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. दिलीप पाटील राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. शेट्टी आणि जयंतरावांचा उभा संघर्ष आहे. तरीही शेट्टींनी ही भूमिका घेतली.

सदाभाऊंवरील गंभीर आरोपाने आज जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे जिल्हा बॅंकांतून आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने शेतकरी आक्रमक आहेत. बॅंक अधिकारी, कर्मचाऱ्यांत असुरक्षिततेची भावना आहे. अशावेळी सदाभाऊंनी बॅंकांवर तोफगोळे डागत सरकारची बाजू घेतल्याची चर्चा होते आहे. त्यातच सदाभाऊ-दिलीपतात्या शाब्दिक लढाई वाढली तर अडचणीचे ठरेल, हे लक्षात घेऊन शेट्टींनी दुपारी पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला.

याबाबत "सकाळ'शी बोलतांना श्री. शेट्टी म्हणाले, 'सदाभाऊ आणि दिलीप पाटील यांच्यातील वाद निरर्थक आहे. जिल्हा बॅंकांमुळे खूप अडचण झाली आहे, हे मान्य आहे. उसाची बिले काढायची वेळ आली, दुधाची बिले थकली आहेत. शेतकऱ्यांची खाती जिल्हा बॅंकेत आहेत. ग्रामीण भागात, तळागाळात नेटवर्क असलेली दुसरी बॅंक नाही. सेवा सोसायट्यांतून शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळते. राष्ट्रीयीकृत बॅंकांत खूप अडचणी येतात. कर्ज घेताना कागदपत्रांचा मोठा घोळ घालावा लागतो, मालमत्ता तारणाची प्रक्रिया किचकट असते. तुलनेत शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकांशी व्यवहार सुलभ ठरतो. या गोष्टी अर्थमंत्री अरुण जेटली यांना सांगणार आहे. दिल्लीत त्यांची भेट घेणार आहे.''

ते म्हणाले, 'दुसरीकडे सदाभाऊंनी मांडलेले मत चुकीचे नाही, कारण जिल्हा बॅंकेतील कारभाराचा अनुभव तसा आहे. कर्जमाफीवेळी खोटे रेकॉर्ड बनवले गेले होते. अनेक बॅंका गैरव्यवहाराने बंद पडल्या, प्रशासन नेमावे लागले. त्यावर सदाभाऊ बोलले होते, ते वैयक्तिक घ्यायची गरज नाही.''

अधिकारी नेमा, व्यवहार सुरू करा
खासदार राजू शेट्टी म्हणाले, 'रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकेत सक्षम अधिकारी नेमावा. त्यांच्या देखरेखीखाली व्यवहार सुरू करावेत, असे मी सुचवणार आहे. जिल्हा बॅंका बंद करण्याचा सरकार विचार करू शकत नाही, कारण तळागाळात नेटवर्क असणारी ही एकमेव बॅंक आहे.''

'मी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहे. दिलीप पाटील यांनी केलेले आरोप ई-सकाळच्या माध्यमातून वाचले; मात्र त्यावर मला काही बोलायचे नाही.''
- सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री

Web Title: sadabhau khot & dilip patil confussion