शिवसेनेच्या बाणामुळे सदाभाऊ, निशिकांत घायाळ

शांताराम पाटील
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला असल्याने या दोन्ही मतदारसंघांत गेली तीन ते चार वर्षे जोरबैठका काढणारे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घ्यावी लागणार आहे.

इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला असल्याने या दोन्ही मतदारसंघांत गेली तीन ते चार वर्षे जोरबैठका काढणारे भाजपचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका घ्यावी लागणार आहे.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढवेल तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेले धैर्यशील माने निवडणूक रिंगणात असतील, त्यामुळे जयंत पाटील व राजू शेट्टी यांच्या विरोधात होणारा पट्टशिष्यांचा सामना आता न खेळताच निकाली निघणार आहे. 

इस्लामपूर विधानसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघांत निशिकांत पाटील व सदाभाऊ यांनी मोठे रान उठवले आहे. ‘लोहा लोहे को काटता है’ अशी चर्चाही सुरू झाली होती.  काही झाले तरी आम्ही निवडणूक रिंगणात असणार असा आवेश या दोघांचा होता. मात्र गेली साडेचार वर्षे एकमेकांवर चिखलफेक करणाऱ्या शिवसेना, भाजपची युती झाल्याने कमळाबाईकडून या दोन्ही मतदारसंघांत इच्छुक असलेल्या निशिकांत पाटील व सदाभाऊ खोत यांच्या इच्छा-आकांक्षांवर शिवसेनेचा बाण घुसला.

युतीच्या नवीन फॉर्म्युल्यानुसार शिवसेना त्यांच्या वाट्याची जागा भाजपला सोडणार नाही. तर भाजपच्या मित्रपक्षांशी शिवसेनेला काही देणेघेणे नाही. त्यामुळे मंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेकडून हातकणंगलेवर जरी दावा सांगितला तरी शिवसेना आपली जागा सोडणार  नाही. त्यामुळे संपर्कात सुसाट सुटलेल्या सदाभाऊ व निशिकांत पाटलांना आता चार पावले मागे सरावे लागणार आहे.

सदाभाऊ खोत हे राजू शेट्टींचे पट्टशिष्य, तर निशिकांत पाटील हे जयंत पाटलांचे पट्टशिष्य मानले जातात. या दोघांनीही एकाच वेळी एकाच पंचवार्षिकमध्ये आपापल्या सहकाऱ्यांशी बंडाचे निशाण फडकावत सवतासुभा मांडला. निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात बंड केल्याने जयंत पाटलांना नगरपालिका सत्तेतून बाजूला जावे लागले होते. तर सदाभाऊंनी राजू शेट्टींच्या विरोधात बंड करून शेट्टींना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अडवण्याची व्यूहरचना केली होती. भविष्यातील या लढती रंगतदार होतील असे चित्र गेल्या तीन वर्षांपासून तयार झाले होते. हातकणंगलेत खासदार शेट्टी यांच्या विरोधात धैर्यशील माने शिवधनुष्य उचलतील हे स्पष्ट झाले; मात्र जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार कोण हा प्रश्‍न अजून अनुत्तरितच राहिला आहे.

अंदर की बात...
गेल्या तीन वर्षांत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींच्यावर तर निशिकांत पाटील यांनी जयंत पाटलांच्यावर अनेक आरोप करत ‘अंदर की बात’ जगजाहीर केली होती. एकमेकांना बघून घेऊ,‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ असे वातावरण निर्माण केले होते. या लढती पाहण्यासाठी मतदारसंघातही अनेक खुमासदार चर्चा सुरू होत्या, मात्र दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने निशिकांत पाटील व सदाभाऊ यांना वेट  अँड वॉच भूमिका घ्यावी लागली आहे.

Web Title: Sadabhau Khot, Nishikant Patil in wait and watch role