अधिकाऱ्यांसाठी सदाभाऊ नॉन सीरिअस?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

महसूल अधिकाऱ्यांची दांडी : टंचाईच्या बैठकीत अधिकारी रमले फेसबुकवर

महसूल अधिकाऱ्यांची दांडी : टंचाईच्या बैठकीत अधिकारी रमले फेसबुकवर

सांगली  - जिल्ह्यात पाणीटंचाई वेगाने वाढत आहे. ११४ गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. या विषयावर आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी तातडीने घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य पोटतिडकीने पाण्याच्या समस्या मांडताना बरेच अधिकारी फेसबुक, व्हॉट्‌सअपमध्ये रमले होते. महसूल विभागाचा एकही अधिकारी बैठकीकडे फिरकला नसल्याबद्दल खासदार, आमदार आणि सदस्यांनी संताप व्यक्त केला. कृषी राज्यमंत्र्यांना अधिकारी गंभीरपणे घेत नाहीत काय, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

जि. प.च्या वसंतदादा पाटील सभागृहात आज कृषी राज्यमंत्री खोत यांनी टंचाई आढावा बैठक आयोजित केली होती. या वेळी खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार श्रीमती सुमन पाटील यांच्यासह जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर, सर्व सभापती आणि सदस्य बैठकीस हजर होते, तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासह पाटबंधारे, महावितरण आणि जिल्हा परिषदेचे अधिकारीही उपस्थित होते.

जतचे सरदार पाटील यांनी डिसेंबरपासून टॅंकर सुरू असलेल्या गावातील बिले निघाली नसल्याचा मुद्दा उचलून धरला. तेथून बैठकीत सदस्यांनी टंचाईबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या हाराकिरीबद्दल संताप व्यक्त करण्यास सुरवात केली. सत्यजित देशमुख, विक्रम सावंत, प्रभाकर जाधव, जितेंद्र पाटील, सतीश पवार, अर्जुन पाटील, ब्रह्मदेव पडळकर, आटपाडीचे सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या बेफिकीचा पाढाच वाचला. 

टंचाईच्या काळात मागणी करूनही अधिकारी टॅंकर देण्यास टाळाटाळ करत आहेत, कृती आराखड्यात गावाचा समावेश नसल्याचे कारण देऊन टॅंकरची मागणी फेटाळली जात आहे. प्रादेशिक योजना बंद असतानाही लाखोंची वीज बिले दिली जात आहेत. त्यांची वसुली होत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याने पाणी योजना बंद आहेत. पाण्यासाठी जनतेची पायपीट सुरू आहे. जनावरांनाही पाणी मिळत नाही. अशा समस्यांची यादीच सदस्यांनी सादर केली; मात्र त्याकडे अधिकारी फारसे गांभीर्याने पाहत नाहीत असेच दिसून आले. शिराळ्याचे सत्यजित देशमुख यांनी टंचाईत टॅंकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत; मात्र काही तहसीलदार, प्रांत तसेच महसूलचे अधिकारी बैठकीस नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावर सर्वच सदस्य आणि आमदारांनीही नाराजी व्यक्त केली. तसेच यापुढे अधिकाऱ्यांना हजर राहण्याबद्दल सक्त ताकीद देण्याची मागणी केली. मंत्री खोत यांनी याची गंभीर दखल घेणार असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आपण मुंबईत असल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी बैठकीस हजर झाले.

टंचाईसारख्या गंभीर विषयावरील बैठकीला अधिकारी दांडी मारत असतील आणि  बेफिकीरपणे मोबाइलवर फेसबुक आणि व्हॉटस्‌अपवर रमत असतील, तर मी गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांवर कडक कारवाई करू.
- सदाभाऊ खोत. कृषी राज्‍यमंत्री

फेसबुक, व्हॉट्‌सअपवर
पाणीटंचाईबाबत अशी गंभीर चर्चा सुरू असताना महावितरण, पाटबंधारे आणि जिल्हा परिषदेचेही काही अधिकारी फेसबुक पाहण्यात आणि व्हॉट्‌सअप चॅटिंगमध्ये मश्‍गूल होते. काही गेम खेळत होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी याचे व्हिडिओ चित्रण केले. याची कुणकुण लागल्यावर काहीजण बिथरले, तर एका अधिकाऱ्याने सगळेच फेसबुक, व्हॉट्‌सअप बघत होते अशी मल्लिनाथी केली; मात्र या चर्चेबाबत त्यांना काही देणेघेणे नव्हते.

Web Title: sadabhau khot not serious for officer