सदाभाऊ खोत यांनी काढली इस्लामपूर प्राताधिकाऱ्याची खरडपट्टी

सदाभाऊ खोत यांनी काढली इस्लामपूर प्राताधिकाऱ्याची खरडपट्टी

इस्लामपूर - ‘ऊस वाहतूकीला रस्ता नाही ’ या प्रश्नाचा निकाल होऊनही कार्यवाही झाली नाही. या प्रश्नी प्रांत कार्यालयात गेलेल्या शेतकर्‍यांना येथील प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी इकडे फिरकायचे नाही, असे म्हणत हाकलून दिले. संबंधितांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे धाव घेत ही कैफियत मांडल्यानंतर सदाभाऊंनी प्रांताधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. शेतकर्‍यांची कामे होत नसतील तर आम्हाला तुमचा विचार करावा लागेल, असा दमही त्यांनी भरला.

किरकोळ कारणावरुनही कार्यालयात आलेल्या लोकांना हातोपे आखडत आरेरावी करणार्‍या प्रांताधिकार्‍यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनीही मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली. 

येथील प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी इस्लामपुरात कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांच्या आरेरावीला अनेक लोकांना सामोरे जावे लागत आहे. तहसील कार्यालयातील लिपीक साळोखे यांचे मारहाण प्रकरण अंगलट येवूनही धडा न घेतलेल्या प्रांताधिकार्‍यांची आरेरावी दिवसेंदिवस वाढत आहे.

गोटखिंडी येथील आनंदराव भीमराव पाटील यांच्या शेतातील रस्त्याबाबत तहसीलदार व प्रांताधिकार्‍यांचा निकाल होऊन सातबार्‍यावर रस्ता मंजूर झाला आहे. या बाबत संबंधीत शेतकर्‍यांनी वाटेसाठी गेले कित्येक दिवस खटपट करुनही त्यांना यश आलेले नाही. ऊसतोड थांबली आहे म्हणून त्यांनी आज प्रांताधिकार्‍यांकडे या बाबत ऊस वाहतूकीला वाट मिळावी म्हणून विनवण्या केल्या.

प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी त्यांच्या विनवण्या धुडकावून लावत प्रांत कार्यालयाच्या आसपास सुध्दा फिरकायचे नाही, असा दम  संबंधीत शेतकर्‍यांना भरला. त्या शेतकर्‍यांनी तडक सदाभाऊ खोत यांचे कार्यालय गाठले. मंत्री खोत यांच्या कानावर झालेली घटना घातल्यानंतर खोत यांनी प्रांताधिकार्‍यांना फोन लावत या बाबत विचारणा केली. शेतकर्‍यांना प्रांत कार्यालयात फिरकु देणार नाही, अशी भाषा वापरणे योग्य नाही असे म्हणत खरडपट्टी केली. शेतकर्‍यांची कामे जर होणार नसतील तर आम्हाला या बाबत विचार करावा लागेल असा प्रांताधिकार्‍यांना दम  भरला.

यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या तालुक्यातील इतर नागरिकांनीही प्रांताधिकार्‍यांच्या आरेरावीचा पाढाच मंत्री खोत यांच्यासमोर वाचला. किरकोळ कारणावरुन प्रांताधिकार्‍यांच्याकडे गेलेल्या अनेक लोकांना हातोपे आखडत प्रांताधिकारी दम देतात असा अनुभव काहींनी सांगितला. खोत यांचा पारा चढला. त्यांनी परत एकदा प्रांताधिकार्‍यांना फोन लावून सर्वसामान्य लोकांबरोबर आदबीने वागा, शेतकर्‍यांना किंमत द्या अन्यथा आपला विचार करावा लागेल असा दम  भरला व संध्याकाळपर्यंत संबंधीत शेतकर्‍याचे काम झाले की नाही या बाबत मला कळवा असे म्हणून फोन ठेवला .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com