'स्वाभिमानी' दोस्ती तुटली; सदाभाऊ भाजपात जाणार!

अजित झळके
रविवार, 21 मे 2017

स्वाभिमानी दुभंगणार
त्याआधीही अनेक मुद्यांवरून शेट्टी-खोत संघर्ष धुमसत आला आहे. दोघांनी एकमेकांना कोपरखळ्या मारून बेजार केले आहे. सदाभाऊ राज्यमंत्री झाल्यापासून या संघर्षाला धार चढली. या दोघांचे संबंध आता तुटेपर्यंत ताणले असून दोघांनी विभक्‍त होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

सांगली - खासदार राजू शेट्टी यांच्याशी सुप्त संघर्षातून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

सदाभाऊ भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्याबाबतचा प्रस्ताव खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे घेवून जाणार आहेत. त्यावर शिक्कामोर्तब होताच सदाभाऊ पक्षप्रवेश करतील. येत्या 29 मे रोजी फडणवीस यांचा इस्लामपूर दौरा निश्‍चित झाला असून त्यावेळीच प्रवेशाची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या मतभेदामुळे आणि जाहीर कलगीतुऱ्याने सदाभाऊ खोत अत्यंत नाराज असून ते आता मैत्री तोडण्याच्या निष्कर्षापर्यंत आले आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील नेतेदेखील सदाभाऊंना भाजपमध्ये ओढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे समजते. त्याचेही काही करणे आहेत. 

भाजपाला हवाय रेडिमेड शेतकरी नेता
भाजपमध्ये सध्या शेतकऱ्यांशी नाळ सांगणाऱ्या नेत्यांची वानवा आहे. शेती कर्जमाफीसह विविध प्रश्‍नांवर राज्यात शेतकऱ्यांनी रान उठवले आहे. अशावेळी सरकारची बाजू मांडताना सदाभाऊंना "स्वाभिमानी'चा बिल्ला आडवा येतोय. सदाभाऊ सरकारच्या बाजूने भूमिका मांडत असताना त्यांचे नेते राजू शेट्टी सरकारवर आगपाखड करतात, हा विरोधाभास हीच मुख्य बातमी बनतेय.

अशावेळी भाजपकडे हक्काचा शेतकरी नेता असावा, यासाठी प्रस्ताव देण्यात आल्याचे समजते. माजी खासदार शरद जोशी यांच्यानंतर भाजपकडे शेतकरी नेतृत्व भरून काढणारे प्रभावी नेतृत्व नाही. ती पोकळी सदाभाऊ भरतील, असे भाजपला वाटते. 

सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडली आहे. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या समर्थकांच्या सरळ दोन गटांत संघटना विभागली गेली आहे. त्यांच्यातील "सोशल वॉर' आता चव्हाट्यावर आले आहे.

शुक्रवारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंसमोरच मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालय उद्‌घाटन समारंभाला दांडी मारत शेट्टींनी शिवसेनेशी गट्टी केली आणि नाशिकला सेनेच्या शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली.

स्वाभिमानी दुभंगणार
त्याआधीही अनेक मुद्यांवरून शेट्टी-खोत संघर्ष धुमसत आला आहे. दोघांनी एकमेकांना कोपरखळ्या मारून बेजार केले आहे. सदाभाऊ राज्यमंत्री झाल्यापासून या संघर्षाला धार चढली. या दोघांचे संबंध आता तुटेपर्यंत ताणले असून दोघांनी विभक्‍त होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

जिल्हा परिषद निवडणुकीत सदाभाऊंचे पुत्र सागर यांच्या उमेदवारीवरून शेट्टींनी घराणेशाहीची टीका केली आणि दोघांतील दरी वाढत गेली. या पार्श्‍वभूमीवर शेट्टींवर दबावतंत्र वाढवण्यासाठी सदाभाऊंनी सागर खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांच्या भाजप प्रवेशाचे अस्त्र उपसले होते. महिना अखेरीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा समारंभ उरकण्याचे ठरले होते. 

सदाभाऊ स्वतः मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच राहणार, अशी प्राथमिक चर्चा होती. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांत वेगवान घडामोडी घडल्या असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चेअंती सदाभाऊंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

सदाभाऊ हे घटकपक्षाचे नेते, शिवाय राज्यमंत्री असल्याने हा निर्णय केवळ मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात नाही. त्याबाबत अमित शहा यांच्यासोबत चर्चा गरजेची असल्याने हा प्रस्ताव दिल्ली दरबारी जाणार आहे. तेथून हिरवा कंदील दाखवला गेला तर 29 रोजीच सदाभाऊ भाजपचे माप ओलांडतील. 

Web Title: Sadabhau Khot set to enter BJP