सदाभाऊंच्या बंगल्यावर शेतकऱ्यांची धडक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

आंदोलनकर्त्यांना अटक - दरासाठी सकल ऊस परिषदेचा ‘स्वाभिमानी’ला घरचा आहेर

आंदोलनकर्त्यांना अटक - दरासाठी सकल ऊस परिषदेचा ‘स्वाभिमानी’ला घरचा आहेर

इस्लामपूर - ऊस आंदोलन काळात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची त्रेधा उडवणाऱ्या पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आज खऱ्या अर्थाने मंत्र्यांचे दुखणे काय असते, याचा अनुभव आला. इस्लामपुरातील त्यांच्या आलिशान बंगल्यासमोर आज सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ३५०० रुपये दरासाठी धरणे आंदोलन केले. पूर्वीप्रमाणेच या शेतकरी नेत्याच्या बंगल्याला संरक्षण देण्यासाठी पोलिस फौजफाट्याने वेढले होते. सत्तेच्या जीवावर आंदोलकांचे गळे घोटले जातात, असा आरोप आजही झाला. फक्त आरोप होणारे आणि करणारे दोन्हीही शेतकरी संघटनेचे होते. मंत्र्यांच्या दारात जाऊन दर मागायची ‘स्वाभिमानी’ची परंपरा सकल शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पुढे सुरू ठेवली. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा सरकार बरोबर तडजोड करून एफआरपीपेक्षा जादा १७५ रुपयांचा पहिला हप्ता मान्य करून शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यांचा निषेध म्हणून सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज खोत यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. भजन करीत खर्डा-भाकरी खाऊन सुमारे साडेतीन तास आंदोलन करण्यात आले. दुपारी अडीचच्या सुमारास पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

आघाडी सरकार काळात हाच कित्ता स्वाभिमानीने तत्कालीन तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावात जाऊन घराघरांसमोर आंदोलने केली होती. आता संघटना सत्ताधारी झाली. एकही टायर न फुटता संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच यशस्वी तोडगा निघाला. सरकार व कारखानदारांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना वगळून असा तोडगा निघाला, असा सकल शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास बळिराजा शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, सकल ऊस परिषदेचे कार्यकर्ते एकत्रितपणे मोटारसायकलवरून इस्लामपूरच्या दिशेने आले. येथील आष्टा नाक्‍यावरून मोटारसायकल रॅलीने शहरात प्रवेश केला. शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून पंचायत समितीकडे रॅली रवाना झाली. प्रचंड पोलिस बंदोबस्तात रॅली पंचायत समितीजवळ पोहोचली. त्या ठिकाणी असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली खोत यांच्या येथील प्रशासकीय इमारतीजवळील टुमदार बंगल्याकडे वळली.

त्या ठिकाणी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने रॅली श्री. खोत यांच्या बंगल्यापासून १०० मीटर अलीकडेच पोलिसांनी अडवली. यावेळी पोलिस प्रशासनाने आचारसंहितेचे कारण पुढे करून जमावबंदीची भीती घातली. ‘तुम्हाला या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही’ अशी भूमिका घेतली. बळिराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील व सकल ऊस परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना याबाबत ‘लेखी द्या, मग आम्ही तुमचे मानू’ असा पवित्रा घेतला. अखेर अर्ध्या तासाच्या हुज्जतीनंतर रस्त्यालगत असलेल्या अडगळीच्या जागेत आंदोलकांना बसायला परवानगी दिली. आंदोलकांनी त्या ठिकाणी तळ ठोकत भजनाला सुरवात केली. दोन तासांच्या भजनानंतर आंदोलकांनी खर्डा-भाकरी खाल्ली. यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. खोत यांचा निषेध नोंदवत आंदोलक पोलिस गाडीत बसले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, उमेश शेवाळे, अविनाश पाटील, सकल ऊस परिषदेचे रणजितसिंह दिलीपराव माने-पाटील, यशवंत ऊर्फ बंटी देसाई, मुकुंद गावडे, पांडुरंग माने, विकास पाटील, बळिराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. 

सदाभाऊंचे दोन बंगले..
मरळनाथपूरसारख्या छोट्याशा गावातून सुरू झालेल्या सदाभाऊंच्या यशस्वी प्रवासाचे दर्शनही आज अनेक कार्यकर्त्यांना झाले. सदाभाऊंचे इस्लामपुरात दोन बंगले आहेत. येथील प्रशासकीय भवनाच्या परिसरात तीन मजली टुमदार बंगला बांधला आहे. तर दुसरा बंगला युसुफ सावकार कॉलनी परिसरात आहे. त्या ठिकाणी ते राहायला असतात. या दोन्ही ठिकाणी स्वाभिमानीचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले होते. आंदोलन नेमके कोणत्या ठिकाणी होईल याचा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनाही अंदाज नव्हता. त्यामुळे दोन्हीकडे सदाभाऊ समर्थकांची मोठी जमवाजमव होती.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील बंगल्यासमोरचे आंदोलन म्हणजे निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट आहे. सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांना हे आंदोलन करायला लावले आहे. यातून उसाचा मुद्दा बाजूला ठेवत स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग सदाभाऊ खोत करीत आहेत.
- रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटनेचे नेते 

पोलिसांची तारांबळ...
आंदोलनस्थळी सकाळपासूनच फौजफाटा होता. निरीक्षक प्रताप मानकर यांनी खोतांच्या बंगल्याजवळ बसायला प्रारंभी परवानगी दिली. परत रस्त्याकडेला बसा, असा आदेश दिला. नंतर बसूच नका, आचारसंहिता आहे, जमावबंदी आहे, अशी कारणे देत आंदोलकांना जायला सांगितले. वरून फोन येईल तसे पोलिसांचे वर्तन बदलत होते, असा आरोप आंदोलकांनी केला.

कारखानदार ३५०० रुपये दर देऊ शकत असतानाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तडजोड करून कमी दर घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा विश्‍वासघात केला आहे. त्यांच्या या वर्तनाने शेतकऱ्यांचा चळवळीवरील विश्‍वास उडेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे आम्ही सकल ऊस परिषदेच्या माध्यमातून बिगर राजकीय व्यासपीठ तयार करून आंदोलनात सक्रिय झालो आहोत.
- रणजितसिंह दिलीपराव माने-पाटील, शिरोळ

आम्ही कोल्हापूर व सांगली येथे ऊस दरासंदर्भातील बैठकीत घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना मान्य आहे. त्यामुळेच आज माझ्या घरासमोर आंदोलन करायला आलेल्या लोकांना प्रतिसाद मिळाला नाही. ७० ते ८० कार्यकर्त्यांच्या जीवावर बेछूट आरोप करणे सोपे असते. आंदोलनासाठी जमा संख्या पुरेशी बोलकी आहे. यावरूनच आमची भूमिका शेतकऱ्यांना मान्य असल्याचे दिसते.
- सदाभाऊ खोत, कृषी व पणन राज्यमंत्री

Web Title: Sadabhau residence hit by farmers