सदाभाऊंच्‍या घरासमोर उपोषण; शेट्टींचा निषेध

सदाभाऊंच्‍या घरासमोर उपोषण; शेट्टींचा निषेध

सांगली - यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी कोल्हापूर जिल्ह्यात काढलेला दराचा तोडगा सांगली जिल्ह्यातही लागू करण्‍याचा प्रयत्‍न अाज येथे बैठकीत करण्‍यात आला. मात्र, बळिराजा शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड, शेतकरी परिषद, सकल ऊस परिषद, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी हा दर अमान्य करीत बैठकीतून निषेधाच्या घोषणा देत बाहेत पडले. एकरकमी साडेतीन हजार पहिली उचल दिल्याशिवाय उसाला कोयता लावू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. बैठक संपल्यानंतर खासदार राजू शेट्टी बाहेर पडताना शेट्टींचा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तर मंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिला. 

राजू शेट्टी व मंत्री खोत हे सरकारकडून मॅनेज झाले असल्याचा आरोप संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या वेळी केला.

एफआरपीपेक्षा प्रतिटन जादा १७५ रुपये पहिली उचल देण्यावर एकमत 
झाल्याचे आज येथे कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जाहीर करण्यात आले. मात्र, पाच शेतकरी संघटनांनी हा तोडगा अमान्य केला. संघटनांच्या प्रतिनिधींनी साडेतीन हजार उचलीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू ठेवत असल्याचे सांगितले. 

कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एफआरपीपेक्षा जादा १७५ चा फॉर्म्युला मान्य केला होता. मात्र सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना बैठकीसाठी न बोलविल्याने पेच निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा बॅंकेत रविवारी बैठक झाली. खासदार राजू शेट्टी, पणन मंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा बॅंक अध्यक्ष दिलीप पाटील प्रमुख उपस्थित होते. ‘सोनहिरा’चे अध्यक्ष मोहनराव कदम, ‘वसंतदादा’चे अध्यक्ष विशाल पाटील, ‘माणगंगा’चे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख, ‘क्रांती’चे अध्यक्ष अरुण लाड, ‘श्री श्री’चे बाळासाहेब पाटील, ‘महांकाली’चे प्रतिनिधी गणपती सगरे, ‘मोहनराव शिंदे’चे सूर्यकांत पाटील, ‘उदगिरी’चे उपाध्यक्ष नंदकुमार पाटील, ‘हुतात्मा’चे कार्यकारी अधिकारी नरेंद्र कापडणीस उपस्थित होते. 

बैठकीमध्ये प्रथम साखर कारखानदार, मंत्री खोत यांच्यात चर्चा झाली. चर्चेत साखरेचे सध्याचे दर, उतारा, दुष्काळी भागातील कारखान्यांची आर्थिक परिस्थिती, कारखानदारांची एफआरपीपेक्षा जादा दराच्या तयारीचा अंदाज घेतला. त्यानंतर विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दराबद्दल मते मांडली. सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, कारखानदार, जिल्हा बॅंकेचे प्रतिनिधी यांच्यात खुली बैठक झाली. पुन्हा चर्चा झाली. चर्चेनंतर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्न मान्य केला. बॅंकेचे अध्यक्ष पाटील यांनी जिल्ह्यातील कारखानदार एफआरपीपेक्षा जादा १७५ रुपये दर देणार असल्याचे जाहीर केले.  

संघटनेचे संजय कोले यांनी राजस्थानमधील गणदेवीपेक्षा २०० रुपये जादा दराची मागणी केली. बी. जी. पाटील पहिल्या साडेतीन हजार उचलीवर ठाम राहिले. बाळासाहेब कुलकर्णी यांनी एफआरपी नको, एमआरपी हवी, अशी मागणी केली. महादेव कोरे व कुलकर्णी यांनी व्यावसायिक वापरासाठी १०० रुपये किलोने साखर विक्री करा, असे सुचविले. संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंधकर साडेतीन हजारांवर ठाम होते. अशोक माने यांनी मागील थकीत बिलांबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला. शेखर कुरणे, प्रदीप पाटील यांनीही मते मांडली. 

साखर कारखानदारांची भूमिका मांडताना श्री. लाड म्हणाले, ‘‘उसाला साडेतीन हजारपेक्षा अधिक दर द्यावा वाटतो; मात्र तशी परिस्थिती नाही.’’ ‘वसंतदादा’चे अध्यक्ष विशाल पाटील यांनी वारंवार यंदाच्या पहिल्या उचलीवरच बोला, असा उल्लेख केला. शेतकऱ्यांनी ‘वसंतदादा’च्या थकबाकीबद्दल प्रश्‍न उपस्थित केले. कारखानदारांतर्फे सूर्यकांत पाटील, एम. एन. कदम यांनी मते मांडली. 

खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी साखर दराचा अंदाज घेऊन आम्ही एफआरपीपेक्षा २० टक्के दर कमी घेतला. यंदा प्रथमच जादा दर देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही ३२०० वर ठाम असलो तरी एफआरपीपेक्षा किती देणार, हे महत्त्वाचे होते.’’ 

दृष्‍टीक्षेपात
राज्य बॅंकेकडून साखरेच्या ९० टक्के उचल मिळणार 
‘वसंतदादा’च्या २०१३-१४ मधील बिलासाठी राजू चव्हाणांची आत्महत्येची धमकी
ऊसदरासाठी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यासमोर आज निदर्शने
ऊसदरासाठी राज्यात प्रथमच जिल्हा बॅंक अध्यक्षांची मध्यस्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com