सदाभाऊंचा पी.ए. झाला राजू शेट्टींचा राज्य प्रवक्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे स्विय सहायक म्हणून दीड वर्षे काम केलेले पवार आता शेट्टींचा प्रवक्ता म्हणून काम पाहतील.

सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर पक्षात मोठे फेरबदल सुरु केले आहेत. पुण्यात सुरु असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या अधिवेशनात आज महत्वाचे निर्णय जाहीर केले जात आहेत. त्यात अनिल पवार यांना स्वाभिमानीच्या राज्य प्रवक्तेपदी संधी देण्यात आली आहे.

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे स्विय सहायक म्हणून दीड वर्षे काम केलेले पवार आता शेट्टींचा प्रवक्ता म्हणून काम पाहतील. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर आणि संघटनेत फूट पडून सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी नवनवे प्रयोग सुरु केले आहेत. राजकीय पटलावर त्यांनी उचललेली पावले भाजपला टोकाचा विरोध करणारी आणि राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जुळवून घेणारी दिसत आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत स्वाभिमानी अधिक ताकदीने आणि वेगळ्या धोरणांसह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी संघटना व पक्ष या दोन्ही पातळ्यांवर फेरबदल केले जात आहेत. अनिल पवार यांनी दहा वर्षे माध्यम प्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला. सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहायक म्हणून ते काम पाहत होते. सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर सुमारे दीडएक वर्षे ते त्यांच्यासोबत होते. शेट्टी-सदाभाऊ संघर्षात पवार यांनी सदाभाऊंना राजीनामा सोपवून राजू शेट्टींकडे धाव घेतली. सध्या तासगावचे महेश खराडे हे राज्य प्रवक्ते म्हणून काम पहात होते. त्यांना सक्रिय पद देऊन पवार यांच्याकडे राज्य प्रवक्तेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadabhaus PA became the Raju Shettis state spokesman