खासदार शेट्टींनी बगलबच्चांना लगाम घालावा - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

कोल्हापूर - खासदारांनी आजूबाजूला असलेल्या बगलबच्चांना लगाम घालावा, अन्यथा दरबारातील हुजऱ्यांचा बंदोबस्त कसा करायचा याची व्यवस्था केली जाईल, असा स्पष्ट इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात आज पहिल्यांदाच त्यांनी जाहीर टीका केली, त्यामुळे स्वाभिमानी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत आज पुन्हा मिळाले.

येथील स्वास्थ्य मंत्रा आरोग्य उपक्रमाच्या निमित्ताने मंत्री खोत आज दुपारी कोल्हापुरात होते. आत्मक्‍लेश यात्रेपासून सदाभाऊंनी दूर राहिलेलेच बरे असे म्हटले जात असल्याबाबत खोत यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, ""सदाभाऊ मळलेल्या वाटेवरून जात नाही, वाट कोठे जाते यापेक्षा सदाभाऊ स्वतः वाट तयार करतो. राजू शेट्‌टींना आत्मक्‍लेश यात्रेपासून सदाभाऊ दूर राहावे असे वाटत असेल, तर मी दूर राहतो. त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांकडून फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर सुरू केलेली टीका- टिप्पणी खेद वाटणारी आहे. मी काही राजघराण्यात जन्मलो नाही. त्यामुळे माझ्या मिशीला खरकटे लागली आहेत असे कोणी म्हणत असेल, तर ती खरकटे पुसून आम्ही पुढे जाऊ; पण खरकट्याबाबत बोलणाऱ्यांनी तेवढेच काम करत राहावे. चळवळीत येण्यासाठी मला कोणी निमंत्रण दिलेले नाही. तीस वर्षे मी चळवळीत आहे.''

नाडी परीक्षण
स्वास्थ्य मंत्रा या आरोग्य तपासणी उपक्रमात आज मंत्री खोत सहभागी झाले. वैद्य मारुती जाधव यांनी त्यांचे नाडीपरीक्षण केले. या वेळी सदाभाऊ भाजपचे की स्वाभिमानीचे हे सांगणार काय, असा चेष्टेचाही विषय झाला. मात्र, मोठा आवाज ऐकल्यावर चक्कर येते, असे सदाभाऊंनी सांगताच, वैद्यांनी नाडीपरीक्षण करून त्यांना औषधे दिली. त्यांचा नाडीपरीक्षणाचा विषय मात्र या ना त्या पद्धतीने चर्चेचा ठरला.

Web Title: sadabhu khot talking to raju shetty