सदरबझार बनला अतिक्रमणांचा ‘बाजार’

Encroachment
Encroachment

सातारा - येथील सदरबझारला वर्षानुवर्षे लागलेली अतिक्रमणाची वाळवी आता अधिकच वाढली आहे. आरटीओ कार्यालय, जिल्हा परिषद, शासकीय विश्रामगृह, सैनिक स्कूलच्या मैदानाभोवती किरकोळ विक्रेते, खाद्यपदार्थांच्या टपऱ्या वाढल्या असून, त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे, तरीही त्याकडे पालिका, संबंधित प्रशासकीय यंत्रणा उघड्या डोळ्याने दुर्लक्ष करत आहेत.

पोवई नाका येथे ग्रेडसेपरेटरचे काम सुरू असल्याने वाहतूक अंतर्गत रस्त्यांवरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे या पर्यायी रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. सध्याचे रस्ते अरुंद असून, त्यातून मोठी वाहने, दुचाकींची नियमित वाहतूक सुरू आहे. या रस्त्यांना सध्या उसंतही मिळत नाही, अशी स्थिती आहे. दोन्ही बाजूने मोठी वाहने आली, तर एका बाजूच्या वाहनास बाजूला थांबावे लागते, अशी स्थिती आहे. त्यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडत आहे. त्यात अतिक्रमणांचा पेव जादा फुटला आहे. कुबेर विनायक मंदिराच्या मागील चौकापासून आरटीओ कार्यालय आणि शासकीय निवासस्थान इमारतीमधील रस्त्यांवर विविध चहा, पेय, खाद्य पदार्थांच्या टपऱ्यांनी जणू काय हा रस्ता ‘हॉकर्स झोन’ बनविला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगतचा पदपथ, तर एजंटांनी हा पदपथ स्वत:च्या मालकीचा असल्याप्रमाणे त्यावर स्टॉल उभे करून बस्तान मांडले आहे. शिवाय, नो पार्किंगचे फलक लावून स्वत:चा ‘कायदा’ही बनविला आहे. 

देश, राज्यस्तरीय मान्यवर येत असलेल्या येथील शासकीय विश्रागृहाच्या कोपऱ्यावरही चायनीज गाडेवाल्यांनी बस्तान मांडलेले आहे. सैनिक स्कूलच्या मैदानासमोरील रस्त्यावर तर चक्‍क फळे विक्रेते स्टॉल टाकून उभे असतात. वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना ते दिसतात की नाही, हा प्रश्‍नच सातारकरांना पडत आहे.

ट्रॅफिक सिग्नलजवळ अतिक्रमणे
जिल्हा परिषदेच्या इमारतीजवळ मुख्य चौकात अतिक्रमणे करण्याची मजल मारली आहे. या चौकात ट्रॉफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित असल्याने तेथे वाहने उभी राहण्यास पुरेशी जागा आवश्‍यक आहे. तरीही तेथे वडापाव, चायनीजचे गाडे पालिकेच्या नाकावर टिच्चून उभे आहेत. सध्या तर तेथे बस उभ्या राहात असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. एखाद्या वाहनाचे नियंत्रण सुटून दुर्घटनाही होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com