sadhabhaukhot
sadhabhaukhot

सरकारमध्ये भाजपसोबत तरीही मी "स्वाभिमानी'चाच 

जयसिंगपूर - सरकारमध्ये भाजपसोबत असलो तरी मी "स्वभिमानी'चाच आहे. राम-लक्ष्मणाची जोडी फुटणार नसल्याचे स्पष्ट करून काही दिवसांपासून भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खुद्द कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीच पडदा टाकला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या येथील मेळाव्यात रविवारी ते बोलत होते. सोशल मीडियाच्या मागे न लागता कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोचून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत अधिकाधिक जागांवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याचे आवाहनही खोत यांनी केले. मेळावा आज कल्पवृक्ष गार्डनमध्ये झाला. 

खासदार राजू शेट्टी म्हणाले, की गगनबावडा वगळता जिल्ह्यातील सर्व जागा स्वाभिमानी लढवेल. जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 35 जागांची गरज आहे. सध्याच्या स्थितीवरून एकहाती 35 जागा कोणत्याही पक्षाला निवडून आणता येणार नाहीत. अशा स्थितीत स्वाभिमानी "किंगमेकर' ठरेल. 

भाजपने कोल्हापूर व सांगली वगळता युतीबाबत चर्चा केली नाही. लोकसभेत पराभव झाला तरी चालेल; पण अधिकाधिक कार्यकर्त्यांनी निवडणुकीत निवडून आणू. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा गुलाल पुसून कार्यकर्त्यांनी लगेच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आंदोलनास सज्ज व्हावे. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू. संघटनेत घराणेशाहीला थारा नाही. त्यामुळे संघटनेच्या बिल्लेवाल्यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. 

जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, सुरेश कांबळे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जालंदर पाटील, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा अपराज, बाळासाहेब पाटील, एकनाथ जठार यांची भाषणे झाली. तालुकाध्यक्ष आदिनाथ हेमगिरे यांनी स्वागत केले. अण्णासाहेब चौगुले यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती सीमा पाटील, पंचायत समितीच्या उपसभापती अनंतमती पाटील, नगरसेवक शैलेश चौगुले, दीपाली ठोमके, शहराध्यक्ष मिलिंद साखरपे, राजाराम देसाई, रामचंद्र फुलारे, उदगावच्या सरपंच स्वाती पाटील, गुरू रिसवूड, संतोष पाटील, शैलेश आडके, सागर संभूशेटे, पंचायत समिती सदस्य वसंत हजारे, संजय पाटील, सुनंदा दानोळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

स्वबळाची चर्चा 
मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीबाबत निर्णय घेईल अशी शक्‍यता होती. मात्र, मेळाव्यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडून आणण्याचा निर्धार झाला. शिवाय, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत भाजपकडून आघाडीबाबत स्वाभिमानीशी चर्चा झाली नसल्याने कदाचित स्वाभिमानी स्वबळावर लढते असा तर्क या मेळाव्यातील चर्चेवरून काढला जात आहे. 

निवडणुकीनंतर कर्जमुक्ती आंदोलन 
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन करेल असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मेळाव्यात दिला. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही एकसंध राहून शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com