शेट्टींनी आधी बुडाखालचा जाळ बघावा - सदाभाऊ खोत

शेट्टींनी आधी बुडाखालचा जाळ बघावा - सदाभाऊ खोत

इस्लामपूर - राजू शेट्टी घसरलेला "टीआरपी' वाढविण्यासाठी माझ्यावर टीका करीत आहेत. अगोदर त्यांनी स्वतःच्या बुडाखालचा जाळ बघावा. त्यांचे स्वीय सहायक व बगलबच्चे काय उद्योग करताहेत? याकडे लक्ष द्यावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकार बैठकीत हाणला. 

ते म्हणाले, ""काहींची दुकानदारी माझे नाव घेतल्याशिवाय चालत नाही. मी दोन महिने शांत होतो. आता संयम संपलाय. ज्यांनी आत्मक्‍लेष आंदोलनाअगोदर पुण्यात फुलेवाड्यात जाऊन "भाजपला पाठिंबा देऊन मी चूक केली, त्याचा पश्‍चात्ताप होतोय, त्यातूनच मी आत्मक्‍लेष यात्रा काढतोय' असे विधान केले, त्यांनी नंतर लगेच दिल्लीत जाऊन राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत मतदान केले. ही शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक नव्हे काय? जे शेट्टी महात्मा फुलेंना फसवितात, ते सामान्य शेतकऱ्याला काय करीत असतील? त्यांचे वागणे नेहमीच दुटप्पी असते. कोणत्याही कार्यकर्त्याला मोठे होऊ द्यायचे नाही, स्वार्थ साधायचा, फेकून द्यायचे ही त्यांची रणनीती आहे. त्यांनी यापूर्वी रघुनाथदादा पाटील यांचा वापर करून मोठ्या नेत्यांवर आरोप केले. त्यानंतर उल्हास पाटील यांच्यामार्फत टोकाचे आरोप केले. मला पुढे केले. माणसांचा वापर करायचा व तो माणूस मोठा झाला, की आपोआप बाजूला करण्यासाठी षडयंत्र रचायचे, ही त्यांची आजवरची कूटनीती आहे.'' 

ते म्हणाले, ""शेट्टींना सरकारमधून बाहेर पडायचे नव्हते, तर सदाभाऊला बाहेर काढायचे होते. माझ्यावर नेमलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या चौकशी समितीतील सदस्यांची माझी चौकशी करण्याची पात्रता नसतानाही मी चौकशीला सामोरे गेलो. मला संघटनेतून बाहेर पडायचे नव्हते. प्रत्येक वेळेला ते म्हणतात, माझे हात स्वच्छ आहेत. देह स्वच्छ आहे. मग, आम्ही त्यांच्याबरोबर काम करताना आमचा देह चुलीत जळण्यासाठी होता का? शेट्टींना दुसऱ्याच्या योगदानाचा विसर पडलाय. आता माझे नाव घेऊन ऊस हंगामापर्यंत स्वतःचा टीआरपी वाढवायचा, पुन्हा लोकांच्या भावनेला हात घालायचा व हात वर करून ऊसदर दिला नाही म्हणून परत निवडणुकीला सामोरे जायचे, ही त्यांची रणनीती आहे. कर्जमाफीचा निर्णय पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा आहे. ज्यावेळी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले, त्यावेळी शेट्टींनी संपावर जाणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही किंवा योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. शेतकऱ्यांचा संप यशस्वी होतोय म्हटल्यावर ते त्या आंदोलनात सामील झाले. माझ्यावर आरोप करीत सरकारबरोबरच्या चर्चेनंतर गुलाल उधळत मुंबईपासून शिरोळपर्यंत आले. मिरवणुका काढल्या. यात ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही ते शेतकरी आपल्याबरोबर राहणार नाहीत, असे लक्षात आल्यावर परत दुकानदारी चालण्यासाठी त्यांनी संपूर्ण कर्जमाफीचा नारा दिला.'' 

विश्‍वासघात कसा? 
माझा विधान परिषदेचा अर्ज भरताना शेट्टी स्वतः पुढे होते. भाजपने विश्‍वासघात केला असे म्हणतात, मग त्यांनी माझी मिरवणूक का काढली? त्यांना विश्‍वासघात त्या वेळी समजला नाही का? यावरून त्यांचे हे सर्व उपद्‌व्याप दुकानदारी चालण्यासाठी सुरू असल्याचे स्पष्ट दिसते, असे खोत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com