रोहित पवार यांचा पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

कर्जत तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी बारडगाव गणातील साधना कदम यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. काल भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल झालेल्या कदम यांनी सभापतिपदी बिनविरोध निवड होताच त्या राष्ट्रवादीच्या सदस्यांबरोबर सभागृहातून बाहेर पडल्या.

कर्जत : कर्जत तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी बारडगाव गणातील साधना कदम यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. काल भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल झालेल्या कदम यांनी सभापतिपदी बिनविरोध निवड होताच त्या राष्ट्रवादीच्या सदस्यांबरोबर सभागृहातून बाहेर पडल्या. निवडीनंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून युवा नेते रोहित पवार यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. 

भाजपच्या पुष्पा शेळके यांना तिसऱ्या अपत्याच्या कारणाने न्यायालयाच्या आदेशामुळे राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे सभापतिपदासाठी निवडणूक झाली. आज पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली सभापतिपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी 10 ते 12 या कालावधीत सभापतिपदासाठी साधना कदम यांनी दोन अर्ज दाखल केले. दुपारी 2 वाजता पीठासीन अधिकारी नष्टे यांनी कदम यांचे दोन्ही अर्ज वैध असल्याची घोषणा केली. दुसरा अर्ज न आल्याने कदम यांची सभापतिपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 

हे सभापतिपद औटघटकेचे ठरणार असले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या राजकीय घडामोडीला महत्त्व आहे. आजची घटना पालकमंत्री शिंदे यांना मोठा धक्का मानली जाते. या राजकीय घडामोडीबद्दल भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. 

भाजपमधील कदम पुन्हा स्वगृही 
काल सायंकाळी कदम भाजपमध्ये गेल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे शेळके यांना सभापतिपदावरून पायउतार व्हावे लागले, तरी सत्ता आमच्याकडेच राहणार असा भाजपकडून दावा केला जात होता. मात्र, निवड जाहीर होताच कदम राष्ट्रवादीचे सदस्य राजेंद्र गुंड आणि हेमंत मोरे यांच्याबरोबर बाहेर पडल्या. पंचायत समिती कार्यालयाबाहेर भाजपचे नेते सत्कार करण्यासाठी आले होते. कदम राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांचा हिरमोड झाला. दरम्यान, उपसभापती शिवसेनेच्या बुद्धिवंत यांच्या बदलाच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत.

Web Title: Sadhana kadam elected as sabhapati of Karjat Panchayat Samiti