सुरक्षित मातृत्वासाठी आता ‘माहेरवाशीण’

Mother
Mother

सातारा - पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानात खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सहभाग घेऊन राज्यात आदर्श निर्माण करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेने आता सुरक्षित मातृत्वासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. 
दुर्गम भागात असलेल्या १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रायोगिक तत्त्वावर नावीन्यपूर्ण माहेरवाशीण योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे महिलांना परिपूर्ण आरोग्य सुविधेत सुरक्षित बाळंतपण होवून माता व बालकाचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल.

सातारा जिल्हा परिषदेने राज्यात आरोग्यविषयक कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा नावलौकिक कायम ठेवला आहे. जिल्ह्यात ७२ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४०० उपकेंद्रे, १७ आयुर्वेद दवाखाने, सहा प्राथमिक आरोग्य पथकांमार्फत ग्रामीण भागातील लोकांना आरोग्यसेवा सुविधा पुरविण्यात येतात. ग्रामीण व दुर्गम भागातील गरोदर मातांची बाळंतपणासाठी आरोग्य केंद्रांपर्यंत पोचविण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच काही वेळा अतिवृष्टी व पूरपरिस्थिती यांसारख्या नैसर्गिक आपत्तीप्रसंगी गरोदर मातांची प्रसूती आरोग्य केंद्रात करून तिचे व बाळाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी बाळंतपणाच्या तारखेपूर्वीच संबंधित गरोदर महिलेला आरोग्य संस्थेमध्ये प्रसूतीसाठी दाखल करून घेऊन, तिच्या माहेरी ज्या पध्दतीने तिचे संगोपन, काळजी घेतली जाते, तशी काळजी घेऊन, तिची प्रसूती वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली करून घेणे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी ‘माहेरवाशीण आरोग्य केंद्रां’ची ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रसूती होण्याच्या तारखेपूर्वी किमान सात दिवस व प्रसूतीनंतर किमान तीन दिवस आरोग्यसेवा दिली जाईल. या कालावधीत तिची व तिच्या बाळाची काळजी व त्यांच्या राहण्याची, जेवणाची, तपासणी व औषधोपचाराची सोय मोफत करण्यात येईल. त्यामुळे सुरक्षित बाळंतपण करून माता व बालकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी करणे, घरी होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण शून्य करणे, मातामृत्यू दर, बालमृत्यू व अर्भक मृत्यू दर कमी करणे, गरोदर मातांना गरोदर महिलांचे कुटुंबातील मानसिक व आर्थिक ताण कमी करणे आदी उद्देश साध्य होतील, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी सांगितले.

...या प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड
सळवे, मोरगिरी, मुरुड, हेळवाक, सणबूर, केरळ, तारळे, (ता. पाटण), परळी, ठोसेघर (ता. सातारा), बामणोली, कुसुंबी, केळघर (ता. जावळी), तापोळा, तळदेव (ता. महाबळेश्‍वर), मालतपूर (ता. वाई).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com