सांगलीकरांना मिळाली भरपेट सांस्कृतिक मेजवानी

सांगलीकरांना मिळाली भरपेट सांस्कृतिक मेजवानी

साहित्य, नाट्य, संगीत क्षेत्राने वर्ष गाजवले; सांस्कृतिक चळवळीला ऊर्जितावस्था

राज्यस्तरीय एकांकिका, नाट्य आणि संगीत स्पर्धेत यंदा सांगलीकरांनी चांगली कामगिरी दाखवली. त्यामुळे सरत्या वर्षात येथील सांस्कृतिक चळवळीला पुन्हा ऊर्जितावस्था मिळाल्याचा आनंद सर्वत्र आहे. नवोदित कलाकरांचीही दमदार एंट्री होत असून वर्षभर सांगलीकरांना भरपेट मेजवानीचा आस्वाद घेता आला. सांस्कृतिक चळवळीचा हा आढावा... 
 

रंगला साहित्योत्सव...
सरत्या वर्षात मराठी साहित्य संमेलन, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे साहित्य संमेलन, समततावादी साहित्य संमेलनासह साहित्यविषयक मेजवानी होती. पिंपरी-चिंचवड येथील पहिल्या संमेलनानंतर सांगलीत दुसरे अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे, भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. परिसंवाद, कथा व कविसंमेलनातून विवेकवादी चळवळीचा आवाज बुलंद करण्यात आला. वर्षारंभी भावे नाट्य मंदिरात दुसरे बालकुमार साहित्य संमेलन रंगले. महात्मा गांधी ग्रंथालय आणि आभाळमाया फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बालसृजन साहित्य मंच आयोजित बालकुमार साहित्य संमेलनाला सांगलीकरांनी भरभररून दाद दिली. आरग साहित्य संमेलन, पलूस ग्रामीण साहित्य संमेलन, आभाळमाया निसर्ग साहित्य संमेलन, मिरजेतील कविसंमेलन, धनगरी आणि लिंगायत समाजाचे साहित्य संमेलनेही रंगली. 

नाट्याला ऊर्जितावस्था 
नाट्यपंढरी म्हणून ओळखणाऱ्या सांगलीला गेल्या काही वर्षांत मरगळपणा आला होता. या सांस्कृतिक चळवळीला ऊर्जितावस्था देण्यासाठी तब्बल दोन दशकांनंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेतर्फे आंतरमहाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धा झाल्या. सांगलीतील ललित कला व नाट्य तंत्रशिक्षण महाविद्यालय या कलाकारांनी सादर केलेल्या ‘पार्सल’ एकांकिकेने विजेतेपद पटकावले. इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे ‘दो बजनी ए’ एकांकिकेला दुसरे, तर इचलकरंजीच्या नाईट कॉलेजच्या ‘प्रेम अभंग’ एकांकिकेला तिसरे स्थान मिळाले. स्पर्धेत सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील १४ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात देवापाण्णा आवटी स्मृती करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत औरंगाबादच्या ‘पाझर’ने विजेतेपद मिळवले. सांगलीच्या ‘नथिंग टू से’ने द्वितीय क्रमांक मिळवला. ‘प्रयोग मालाड’ मुंबई या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेत सांगलीतील नाट्यलेखक इरफान मुजावर यांच्या ‘आधे-अधुरे’ एकांकिकेस प्रथम पारितोषिक मिळाल्याने सांगलीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला. श्री. मुजावर यांनी लेखन केलेल्या आणि डॉ. दयानंद नाईक यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘वृंदावन’ या नाटकाने राज्यपातळीवर विविध पुरस्कार मिळवले आहेत. ‘एकच प्याला’मधील सिंधूच्या भूमिकेसाठी सांगलीच्या धनश्री गाडगीळची निवडही यंदाच्या वर्षी झाली. रत्नागिरीत झालेल्या राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेत देवल स्मारकच्या ‘संगीत शारदा’ नाटकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळवला.

पालिकेची एकांकिका...  
महापालिकेतर्फे प्रथमच निमंत्रितांच्या गोवा व महाराष्ट्रीयस्तरीय एकांकिका स्पर्धा झाला. माजी मंत्री मदन पाटील यांच्या स्मरणार्थ घेण्यात आल्या. स्पर्धेत एकूण राज्यातील २६ संघांनी सहभाग नोंदवला. ‘क्‍युरिअर केस ऑफ’ (रंगदर्पण मांद्रे-गोवा)  या एकांकिकेला एक लाखांचे पारितोषिक देण्यात आले. पाझर (नाट्यवाडा, औरंगाबाद) याने द्वितीय, तर भक्षक (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) याने तृतीय क्रमांक पटकावला. 

राज्यस्तरीय एकांकिकेला प्रथमच लाखांचे पारितोषिक देण्यात आले.
सुरेल संगीताची मेजवानी यंदा श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे ६२ वे वर्ष साजरे झाले. प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित भुवनेश कोमकली, गायक हेमा दामले-बेहरे, संगीतकार विजय कदम, धवल चांदवडकरसह अनेक दिग्गजांनी महोत्सव गाजवला. नऊ दिवस संगीतोत्सवाची ही मैफील साऱ्या सांगलीकरांनी अनुभवली. ‘स्वरवसंत’तर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सव झाला. राज्यभरातील नामवंत गायक, वादक सहभागी झाले. गायक महेश काळे यांचे सुरेल गायन आजही सांगलीकरांच्या ओठांवर आहे. ‘अबकड कल्चरल ग्रुप’तर्फे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत महोत्सवही गाजला. पंडित विश्‍वमोहन भट यांच्या मोहनवीणेच्या वादनाने सांगली मंत्रमुग्ध झाले. यासह अनेक संगीत महोत्सवांची मेजवानी होती. 

जयंत सावरकर, कीर्ती शिलेदारांचा गौरव
अखिल मराठी नाट्यविद्या मंदिर समितीतर्फे देण्यात येणारा विष्णुदास भावे गौरव पदक यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देवल स्मारक मंदिरच्या वतीने देण्यात येणारा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल सन्मान पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार देण्यात आला. 

‘गुरुकुल’ची यशस्वी वाटचाल
संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गुरुकुल प्रतिष्ठानची स्थापना दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. आज २५ हून अधिक शिष्य शिक्षण घेताहेत. गायन, वादन आणि नृत्य क्षेत्रातील दिग्गजांबरोबर अनेक नवोदित कलाकारांची मैफील यंदाच्या वर्षी झाली. गायिका मंजूषा पाटील यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी वाटचाल सुरू आहे.

फेस्टिव्हलने झाली वर्षाअखेर 
वर्षाअखेर मिरज फेस्टिव्हल झाले. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या दिग्गजांना ‘मिरज भूषण’ व ‘मिरज गौरव’ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मुकुंद फाटक, डॉ. दयानंद नाईक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. इतिहास संशोधन आणि मोडीच्या प्रसारासाठी योगदान देणारे मानसिंगराव कुमठेकर यांचाही विशेष सत्कार झाला.

शॉर्ट फिल्मची क्रेझ 
मिरजेतील ‘बालगंधर्व’च्या रंगमंचावर आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल झाले. शॉर्ट फिल्मची क्रेझ असणाऱ्या तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. अभिनेते शरद भुताडिया, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. ऑस्कर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यासह ८० लघुपट सहभागी झालेत. नागराज मंजुळेंचा ‘पिस्तुल्या’, ऑस्कर विजेते ‘रेड बलून’ ‘हॅप्पी ॲनिव्हर्सरी’, उमेश कुलकर्णींचा ‘गिरणी’, ‘विलय’ हे लघुपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com