Sahyadri-Tiger-Reserve
Sahyadri-Tiger-Reserve

बेरोजगारांसाठी रोजगारनिर्मितीची किमया

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील सुमारे चौदापेक्षाही जास्त गावांतील बेरोजगार युवकांना कायमस्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देण्याची किमया प्रकल्पातच वन्यजीव विभागाने साध्य करून दाखविली आहे. डॉ. श्‍यामाप्रसाद जन वन विकास योजनेंतर्गत वैकल्पिक रोजगारनिर्मितीतून योजना राबविली आहे. त्या माध्यमातून साहसी उपक्रमांचे सुमारे शंभरपेक्षा जास्त युवकांची निवड केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात ५० युवकांना निवडले आहे. त्यांना शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षणही दिले आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणाऱ्या गावांत विविध योजना वन्यजीव विभाग राबवत आहे. स्थानिक युवकांना कायमचा रोजगार निर्माण व्हावा, यासाठी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन विशेष करून नदीकाठच्या गावांतील युवकांना तो रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. त्या गावातील १८ ते २५ वयोगटातील सुमारे शंभरहून अधिक युवकांची निवड केली जाणार आहे. त्यातील ५० युवकांना प्रत्यक्ष शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले आहे. वास्तविक व्याघ्र प्रकल्पातील स्थिती, त्या साहसी उपक्रमासाठी लागणारी जागा प्रकल्पातील प्रत्येक गावात सहज उपलब्ध आहे. त्या नैसर्गिक स्थितीचा चांगला फायदा घेता यावा, यासाठी प्रामुख्याने साहसी उपक्रमातून रोजगारनिर्मितीचा प्रयोग येथे होत आहे. पहिल्या टप्प्यातील तो प्रयोग यशस्वीही झाला आहे. निवड केलेल्या ५० युवकांना साहसी शिबिरांचे नेतृत्व करणारे अभ्यासक अविनाश देशकर यांच्या माध्यमातून सध्या प्रत्येक गावात आठवडाभर प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. या युवकांना ज्ञान भारती स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये पाठविण्यात येणार आहे. प्रशिक्षण दिलेले युवक साहसी ट्रेकिंगसह अन्य सेवा देण्यासाठीही रूजू होणार आहेत. यासाठी प्रकल्पाच्या उपसंचालिका डॉ. विनिता व्यास यांनी पुढाकार घेतला आहे.

...अशी होणार रोजगारनिर्मिती 
साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण दिल्यानंतर गावातील युवक येणाऱ्या पर्यटकांना त्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी त्या युवकांना झीप लायनिंग, रोप क्‍लायबिंग, रॅपलिंग, कायाकिंग, रॉप क्‍लायबिंग, वॉटर स्पोर्टस्‌, ट्रेकिंग व साहसी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी बामणोलीच्या परिक्षेत्रात आंबवडे येथे निसर्ग पर्यटन संकुल बांधले आहे. तेथे मुक्काम करून पर्यटक वरील सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.

वन्यजीव विभागातर्फे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनच्या गावात अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्याच योजनेचा एक भाग म्हणून डॉ. मुखर्जी जन वन योजनेतून बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी ५० युवकांची पहिल्या टप्प्यात निवड करून त्यांना साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- डॉ. विनिता व्यास, उपसंचालिका, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कऱ्हाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com