"सई रेऽऽ सई...' 

sai tamhankar
sai tamhankar

सांगली - मराठी चित्रपट सृष्टीतील तारका सांगलीची आपली सई ताम्हणकरने स्वच्छतेसाठी जनजागृतीचा भाग म्हणून शहरात आज दिवसभरात मॅरेथॉन कार्यक्रम घेतले. तरुण, वृद्ध महिला अशा समाजाच्या विविध स्तरात जाणीवपूर्वक तिने कार्यक्रम घेतले. नागरिकांसोबत मनमोकळा संवाद साधला. आपलं शहर स्वच्छ ठेवा, निर्मल करा. आपल्या भल्यासाठी अशी तिने भावनिक सादही घातली. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाच्या परिसरात हजारो तरुणांच्या गर्दीला तिने वेड लावले. संपूर्ण कॅंपस "सई रेऽऽ सई'च्या घोषणांनी दणाणला. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याचाच भाग म्हणून सईची स्वच्छतादूत निवड झाली आहे. कालपासून सई शहरात ठिकठिकाणी भेटी देतीय. आज तिने कस्तुरबाईचा कॅंपस गाठला. हजारो तरुणांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. ती म्हणाली,""जगभरातील अनेक देश चकचकीत आहेत. मग आपला देश तसा का असू नये. त्याची सुरवात आपण सांगलीपासून करूया.'' "सई'च्या आगमनाची वार्ता लागताच कॅंपस हाऊस फुल्ल झाला. तिची झलक टिपण्यासाठी प्रत्येकाने मोबाईल कॅमेरे रोखले. एकच जल्लोष सुरू होता. "सई रेऽऽऽ सई' सईने इमारतीवरून हात उंचावत साऱ्यांना "हाय' केले आणि तरुणाई वेडी झाली. ती म्हणाली,""मित्रांनो..आपली सांगली स्वच्छ करायचीय. तुम्ही मदत कराल ना,'' साऱ्यांनी एका सुरात होकार भरला. सारा परिसर दुमदुमून गेला. तिच्याबरोबर "सेल्फी' घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी आयुक्त रवींद्र खेबुडकर, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सुरेश पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. व्ही. बी. कोडग उपस्थित होते. 

दुपारी कुपवाडच्या वृद्धसेवाश्रम आणि वाघमोडेनगर येथील महापालिकेच्या शाळेला सईने भेट दिली. तेथेही गर्दी झाली होती. नागरिकांशी संवाद साधत तिने स्वच्छतेसाठी आवाहन केले. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, कल्पना माळी, माजी आमदार शरद पाटील उपस्थित होते. ज्येष्ठांसोबत तिने आपुलकीने गप्पा मारल्या. सायंकाळी महावीर उद्यानात महिला मेळाव्यास तिने उपस्थिती लावली. जशी परिवाराची काळजी घेता तशी परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वच्छतागृहांसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा योग्य तोच वापर करा, असे आवाहन तिने केले. यावेळी नेत्या जयश्री पाटील, आयुक्त रवींद्र खेबुडकर, दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

मास्टर प्लॅन करणार 
येत्या 7 जानेवारीपर्यंत सईचा जिल्ह्यात मुक्काम आहे. शनिवारी ती विट्यांमध्ये पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी जाणार आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी लोकांच्या सूचना घेऊन ती विविध संस्थांसोबत काम करणार आहे असे ती म्हणाली. दोन-चार दिवसांच्या सांगली दौऱ्यातून पुढील कामाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com