सोनियांना लिहिलेले "ते' पत्र भाजपच्या हस्तकांचेच

आनंद गायकवाड
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

भाजपचे सत्तास्थापनेचे मनसुबे धुळीस मिळाले. त्यातून पक्षांतर केलेल्या नेत्यांचेही खूप मोठे नुकसान झाले. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्याच स्थानिक हस्तकांमार्फत "ते' निवेदन कॉंग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी व प्रसिद्धी माध्यमांना पाठविले

संगमनेर : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलली. त्यात कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एकत्र येऊन स्थीर सरकार देण्यासाठी महाविकास आघाडी उभी करण्याचा निर्णय घेतला. त्यात भाजपचे सत्तास्थापनेचे मनसुबे धुळीस मिळाले. त्यातून पक्षांतर केलेल्या नेत्यांचेही खूप मोठे नुकसान झाले. त्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्याच स्थानिक हस्तकांमार्फत "ते' निवेदन कॉंग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी व प्रसिद्धी माध्यमांना पाठविले असल्याचा दावा कॉंग्रेस पक्षाच्या सेवादलाचे संगमनेरचे अध्यक्ष अनिस शेख यांनी केला आहे. 

स्थानिक हस्तकांच्या इशाऱ्यावर संगमनेरातील भाजपाच्या हस्तकांनी ही भूमिका कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचीही बदनामी करण्यासाठी दिले असल्याचा दावा शेख यांनी केला आहे. मुस्लीम समाजाची कथित फसवणूक केल्याचे पत्र मुस्लीम समाजाच्या काही युवकांच्या सह्यांनिशी अलिकडेच कॉंग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले होते. त्यातून संगमनेरातील मुस्लीम समाजाची निष्कारण बदनामी होत असल्याचे निवेदन अल्पसंख्यांक कॉंग्रेस सेवादलाचे अध्यक्ष शेख यांनी आज प्रसिद्धीला दिले आहे. 

उपमुख्यमंत्रीदाची चर्चा दु:खाचे प्रमुख कारण..! 
या संदर्भात शेख यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुरोगामी विचाराच्या ज्येष्ठ नेते व कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष थोरातांचा गेल्या 35 वर्षातील सक्रीय राजकारणाचा चढता आलेख संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद आहे. सर्वच समाजांना बरोबर घेवून त्यांची राजकिय वाटचाल सुरु आहे. पक्षाच्या पडत्या काळात अनेकांनी साथ सोडली. मात्र, अशावेळी ज्येष्ठ नेते थोरात यांनी दाखवलेली पक्षनिष्ठा व प्रामाणिकपणा पक्षासाठी महत्वाचा ठरला. त्यामुळेच आज थोरात यांचे नाव उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आहे. त्याचेही काहींना अतिव दु:ख होत आहे. कॉंग्रेसने आजवर दिलेल्या मोठ्या सत्तापदांचा व सन्मानाचा विचार न करता केवळ सत्तेच्या मोहापायी सत्तांतर केले. त्यांना भाजप सत्तेपासून दूर राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने दु:ख झाले आहे. आता कोणतेही पद मिळणार नाही, याचे शल्य त्यांच्या समर्थकांना वाटू लागल्याने कॉंग्रेस प्रेमाचा पुळका दाखवीत, शिवसेनेशी युती न करण्याचा फुकटचा सल्ला त्यांच्याकडून दिला आहे. वास्तविक भाजपला दूर ठेवण्यासाठी हा निर्णय राज्याच्या हिताचा आहे. भारतीय राज्यघटनेचा आदर करून महाविकास आघाडी अस्तित्वात येईल. 

"ते' पत्रच संशोधनाचा विषय 
संगमनेरातून रवाना झालेले "ते' पत्रच संशोधनाचा विषय आहे. शहरातून जाणाऱ्या कोल्हेवाडी रस्त्याच्या रखडलेल्या दुरुस्तीसाठी या सह्यांची मोहिम असल्याचे सांगत, एका मुस्लीम नेत्याने या परिसरातील व्यवसायीकांच्या सह्या घेतल्या. त्यांचा वापर या निवेदनासाठी केल्याचे यातील एका युवकाने "सकाळ'ला सांगितले. त्यावरील अनेक सह्या व मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याचे पडताळणीत उघड झाल्याचा दावा शेख यांनी केला आहे. त्यामुळे हा पूर्ण राजकीय डावच असून त्याकडे विशेष लक्ष देण्यासारखे काहीच नाही, अशी भूमिकाही शेख यांनी मांडली. संगमनेरातील मुस्लिम समाजाने कोणताही भेदभाव न करणाऱ्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व कॉंग्रेस पक्षावर भरभरून प्रेम केले आहे. मात्र, त्यांच्याविषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी भाजपच्याच हस्तकाने हे कारस्थान रचल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The said letter  "written to Sonia"  BJP's dummy