संत तुकाराम महाराज यांच्या वाङ्‌मयाची तरुणाईला भुरळ 

संत तुकाराम महाराज यांच्या वाङ्‌मयाची तरुणाईला भुरळ 

पंढरपूर - जीवन कसे जगावे, ते कसे समृद्ध करावे, हे सांगत समाजहितैषी कार्यातून आत्मोद्धार साधण्याचा सल्ला संत तुकाराम यांनी दिला. आजच्या स्थितीतही हे विचार मार्गदर्शक असून, आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यांच्या वाङ्‌मयाच्या प्रेमात पडली आहे. एवढेच नव्हे; तर त्याच्या अभ्यासातून इतरांनाही संत तुकाराम महाराज यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन करत आहे. 

धनाचा सुयोग्य वापर महत्त्वाचा 
भागवत देशमुख-जळगावकर (वय 31) - त्यांच्या घराण्यात वारकरी परंपरा आहे. शिक्षण एमए एमफील, बीएड असून, शेळवे येथील कर्मयोगी विद्यानिकेतनमध्ये प्राचार्य आहेत. ते संत तुकाराम महाराज यांच्या वाङ्‌मयावर पीएच.डी. करत आहेत. ते म्हणाले, ""संत तुकाराम महाराज यांच्या वाङ्‌मयाचा आजपर्यंत अनेकांनी अभ्यास केलाय. प्रत्येक अभ्यासकाचा दृष्टिकोन वेगळा होता. संसाराबरोबरच परमार्थ कसा करावा, हे त्यांनी सांगितले. सगळीकडे भ्रष्टाचार माजला आहे. त्यावरही संत तुकाराम महाराज यांनी ओरखडे ओढले आहेत. "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेचकरी', म्हणजे धन चांगल्या मार्गाने कमवा आणि मिळवलेल्या धनाचा वापर योग्य रीतीने करा, असा संदेश त्यांनी दिला आहे. "साधक झाले कळी बुडबुडीची लांबनळी' यातून त्यांनी अंधश्रद्धेवरही ओरखडे ओढले आहेत.'' मनाची अवस्था सांगताना "मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण' यातून मनावर अंकुश ठेवून आचरण केले तर मन प्रसन्न राहून यश प्राप्त करता येते, हेच त्यांनी पटवून दिले आहे. 

तरुणांना दिशादर्शक विचार 
प्रशांत ठाकरे (वय 35) -
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. "धुंडा महाराज देगलूरकर यांच्या कीर्तन, प्रवचनांचा सांस्कृतिक व वाङ्‌मयीन अभ्यास' या विषयावर पीएच.डी. करत आहेत. ते म्हणाले, ""तुकोबारायांची भाषा ही कळकळीची, विश्‍वकल्याणाची आणि सर्वसामान्यांना समजेल अशी आहे. संगत, व्यसनमुक्ती, आचारविचार यांचे जीवनावर होणारे परिणाम त्यांनी विस्तृतपणे मांडले आहेत. दिशाहिन तारुण्याला ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने प्रेरित करणारे विचार त्यांनी मांडले आहेत. ते आजच्या तरुणांना भावणारे आहेत.'' 

स्वहितातून प्रगती साधावी 
डॉ. किरण बोधले (वय 35) -
 डॉ. बोधले माणकोजी महाराज बोधले यांचे अकरावे वंशज आहेत. ते म्हणाले, "आपल्या हिता जो असे जागता धन्य मातापिता तयाचीया' अशा शब्दांत संत तुकाराम यांनी तरुणांनी आपल्या डोळ्यांपुढे स्वहित ठेवून वागले पाहिजे. तसा जो वागेल त्यांच्या मातापित्यास धन्यत्व प्राप्त होईल, असे म्हटले आहे. आजच्या काळात संकटे आली की, तरुण गांगरून जातात. त्यांना तुकोबारायांनी संकटांचा सामना धैर्याने करण्याचा संदेश दिला आहे. अंधश्रद्धा निमूर्लन, व्यसनाधिनता, पर्यावरण संतुलन अशा अनेक बाबतीत तुकोबारायांचे विचार समाजाला मौलिक मार्गदर्शन करतात.'' 

आत्मसमाधानाबाबत मार्गदर्शन 
बाळासाहेब देहूकर - 
संत तुकाराम यांचे वंशज असलेले बाळासाहेब देहूकर म्हणाले, ""व्यसनाधिनता, कर्जबाजारीपणा, मानसिक ताण, असाध्य रोग यामुळे बऱ्याचदा आत्महत्या होतात. परंतु आत्महत्या किती घातक आहेत, याविषयी तुकोबारायांनी अभंगातून समाजाला संदेश दिला आहे. आपले आचरण शुद्ध ठेवून भक्तीच्या माध्यमातून स्वहित आणि ईश्‍वरप्राप्ती साधावे, असे मार्गदर्शन तुकोबारायांनी केले आहे. विविध अभंगातून त्यांनी जीवनात खरे सुख, मनाची शांतता आणि आत्मसमाधान कशा प्रकारे साधावे, याविषयी संदेश दिला आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com