कोकणातील बालचित्रकारांनी चांद्रयान उतरवले कागदावर

Sakal Drawing Competition 2020 Ratnagiri Marathi News   
Sakal Drawing Competition 2020 Ratnagiri Marathi News  

रत्नागिरी : वाढदिवसाचा केक काढू की प्राणी, कार्टून काढू की फुलपाखरू, चांद्रयान की भित्तीचित्रे, अशा विचारात कागदावर कोणते चित्र काढायचे, हे ठरविताना लहान मुलांसह मोठ्या मुलांमध्येही चलबिचल सुरू होती. वेगवेगळ्या रंगामध्ये रंगून गेलेल्या या विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी धम्माल केली. जिल्ह्यातील 12 केंद्रावर रविवारी (ता. 12) सकाळी असेच चित्र होते. निमित्त होते, सकाळ चित्रकला स्पर्धेचे.
 
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवारी चार गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक गटाला चार विषय असल्याने आवडणारा विषय निवडायचे स्वातंत्र्य होते. मात्र, चारही विषय मुलांना आवडण्यासारखे असल्याने नेमके चित्र कुठले काढायचे, याबाबत मुलांच्या मनामध्ये चलबिचल सुरू होती. लहान गटासाठी अतिशय सुंदर विषय दिलेले असल्याने या मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. फुलपाखरू, पतंग, वाढदिवसाचा केक, वृक्षारोपण, किल्ला, साहसी खेळ, मोटू-पतलू, आवडते कार्टून असे लहान मुलांच्या जिव्हाळ्याचे विषय असल्याने त्यांना सगळ्याची विषयावरील चित्र काढायची होती. 


मुले रमलीत रंगात 
सकाळी प्रश्‍नपत्रिका हातात पडेपर्यंत आणि त्यानंतर विषय निवड होईपर्यंत या मुलांना धीर नव्हता. त्यानंतर मात्र सर्वच लहान मुलांसह मोठ्यांनी कागदावर आपली कलाकुसर सुरू केली. काहीजण रंगीत पेन्सिलने, शिसपेन्सिलने चित्र रेखाटायला सुरवात झाल्यावर वर्गातील आवाज बंद झाला. खोडरबरची शोधाशोध, मित्रापेक्षा चांगले चित्र काढण्याची धडपड, आपले चित्र काढताना मित्राबरोबरच वर्गातील इतर मुलांच्या कागदावरही हळूच नजर टाकून आपल्या चित्राची तुलना केली जात होती.

संगमेश्‍वर तालुक्‍यातील व्यापारी पैसाफंड संस्थेच्या इंग्लिश स्कूलमध्ये मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्रावर कलाशिक्षक जे. डी. पराडकर, सहाय्यक अनंत जाधव, कलाप्रेमी विद्यार्थी हेमंत सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रशालेतील कलावर्ग उपक्रमाचा विद्यार्थ्यांना अशा स्पर्धासाठी चांगला उपयोग होतो, असे मत मुख्याध्यापिका नेहा संसारे व पालकांनी "सकाळ'जवळ बोलताना व्यक्त केले. 

 
पालकांच्या सूचना 
काही ठिकाणी पालकही केंद्रावर उपस्थित असल्याने त्यांच्या सूचनाही सुरू होत्या. अरे फुलपाखरू नको पतंग काढ, किल्ला काढ आणि मोठे चित्र काढ, पटकन काढ आणि ते रंगव, अशा सूचना दिल्या जात असल्याने छोटी मुले पुन्हा आपल्या चित्रात मग्न होत होती. 


मूकबधिर, कर्णबधिर मुलांच्या कलाकृती 
शिक्षक, स्वयंसेवक सर्वांना सूचना देत होते की, चित्र रंगवायला सुरवात करा. त्यामुळे स्केचपेन, खडू, वॉटर कलर चित्रामध्ये भरण्यास सुरवात झाल्यावर चित्रे अधिक खुलू लागली. मूकबधिर, कर्णबधिर मुलांनी काढलेल्या चित्रांना उपस्थितांनी दाद दिली. 

विद्यार्थी संख्या 
अ गट- 625 
ब गट- 566 
क गट- 808 
ड गट- 568 
दिव्यांग - 19  

Remarks : 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com