चला, जपूया मातीचा वारसा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017


अशी असेल मोहीम... 

  • शहरातील प्रातिनिधिक 25 ते 30 वारसास्थळांची स्वच्छता मोहीम. 
  • जनजागृतीपर उपक्रमातून वारसास्थळ जतन व संवर्धनावर भर 
  • जतन व संवर्धनासाठी आवश्‍यक कृती कार्यक्रम, त्याची लोकसहभागातून अंमलबजावणी

कोल्हापूर : पर्यावरणदिनी शहरातील एखाद्या पर्यावरणीय प्रश्‍नाला भिडताना 'सकाळ'चा पुढाकार आणि लोकसहभागातून थेट कृती कार्यक्रम हे आता समीकरणच बनले आहे. गेल्या सात वर्षांत '...झाडे लावूया', '...पंचगंगा वाचवूया' या मोहिमा हाती घेतल्या आणि त्या यशस्वीतेच्या एका विशिष्ट टप्प्यावर असताना आता यंदाच्या पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला, 4 जूनला 'चला, जपूया मातीचा वारसा' या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. 

जगामध्ये मशहूर असं आमचं कोल्हापूर. येत्या काळात कोल्हापूर 'सायबर सिटी' म्हणूनही विकसित होईल; पण बदलत्या जगाचे संदर्भ आत्मसात करतानाच या शहराने आपले मूळचे रांगडेपण, इथली संस्कृती आणि इथला अस्सल कोल्हापुरी बाज तितक्‍याच जिव्हाळ्याने जपला आहे आणि या साऱ्याच्या पाठीमागे येथील ऐतिहासिक वारसा आणि त्याची सळसळती प्रेरणा आहे. त्यामुळेच 4 जूनला या सर्व वारशांची स्वच्छता मोहीम होणार आहे. त्यानिमित्ताने जागृतीपर विविध कार्यक्रमही राबवले जाणार आहेत. 

आजही इथे म्हशींची शर्यत रंगते, बकऱ्याच्या टकरी रंगतात आणि त्र्यंबोलीदेवीची यात्राही तितक्‍याच उत्साहात साजरी होते आणि कोल्हापुरी रग असणारा फुटबॉलही तितक्‍याच ईर्षेने खेळला जातो. ज्या भव्य प्रमाणात येथे गणेशोत्सव होतो, तेवढ्याच भक्तीने येथील प्रत्येक माणूस मोहरमही साजरा करतो. इथल्या प्रत्येक पेठेतील, गल्ली-बोळातील तरुणाई आता 'ग्लोबल' जगाशी स्पर्धा करू पाहतेय. इथला प्रत्येक माणूस मुळातच जिंदादिल. तो जे काही करतो ते मनापासून आणि म्हणूनच त्याची प्रत्येक गोष्ट सर्वोत्तम ठरते आणि त्याच्या याच ध्यासातून आजवर अनेक विधायक उपक्रम यशस्वी झाले आहेत. 

साडेतीन शक्‍तिपीठापैकी एक श्री महालक्ष्मी मंदिर, भवानी मंडप, रंकाळ्याचं खळाळणारं पाणी, जिल्ह्याची जीवनदायिनी पंचगंगा असो किंवा राजर्षी शाहू जन्मस्थळ, शतकोत्तर हीरकमहोत्सवी करवीर नगर वाचन मंदिर. फुटबॉलचा रांगडा बाज जपणारी राजर्षी शाहू, शिवाजी स्टेडियम असो किंवा विठ्ठल मंदिर, बाबूजमाल दर्गा, कोटीतीर्थ, जैनमठ... अशी विविध ऐतिहासिक ठिकाणं, स्मारकं ही या शहराची खऱ्या अर्थाने प्रेरणास्थानं. याच प्रेरणास्थळांच्या साक्षीनं आजही या शहराची वाटचाल सुरू आहे. मात्र त्यांच्याशी असलेलं आपलं नातं आणखी घट्ट करताना आता त्यांना जपण्याची, आवश्‍यक तेथे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपली आहे. म्हणूनच यंदाचा पर्यावरण दिन साजरा करताना सकाळ माध्यम समूह आणि कोल्हापूर महापालिकेच्या पुढाकाराने विविध संस्था, संघटना आणि एकूणच कोल्हापूरकरांच्या सहभागाने ही मोहीम हाती घेतली जाणार आहे. चला, तर मग आपापल्या परीने आपणही स्वतःचे कर्तव्य बजावूया... आपल्या मातीचा वारसा जपूया...! 

    Web Title: Sakal to launch another social cause event in Kolhapur