लक्ष्मण माने यांनी जाहीर माफी मागावी - सकल मराठा समाज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

कोल्हापूर - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार करून ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी मराठा समाजाविषयी प्रक्षोभक विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. माने यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना इंगा दाखवू,’ असा इशारा सकल मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी आज दिला.

कोल्हापूर - अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार करून ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी मराठा समाजाविषयी प्रक्षोभक विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. माने यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना इंगा दाखवू,’ असा इशारा सकल मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी आज दिला. कोल्हापूर प्रेस क्‍लबतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी आणि महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

राजू सावंत म्हणाले, ‘‘मराठा समाज न्याय्य हक्कासाठी आणि अधिकारासाठी सातत्याने संघर्ष करत आहे. दुष्काळ पिकू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही, ही भावना मराठा समाजाची होती. मात्र, माने यांच्यासारखे लोक मराठा समाजातील महिलांविषयी अपशब्द वापरत आहेत. त्यांनी आपल्या तोंडाला लगाम घालावा. माने यांनी महिलांबाबत अपशब्द वापरून सर्वच जाती-धर्मांतील महिलांचा अवमान केला आहे.’’ 

प्रा. मधुकर पाटील म्हणाले, ‘‘मराठा समाजाने १९८४ पासून सुरू केलेल्या लढ्याला २०१८ मेध्य यश आले आहे. ५८ मोर्चे आणि ४२ मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यानंतर आरक्षण मिळाले आहे. दरम्यान, या-ना त्या कारणाने मराठा समाजाविषयी अपशब्द वापरून काहीजण प्रसिद्धी मिळवत आहेत. लक्ष्मण माने यांनी मराठा समाजाबद्दल प्रक्षोभक विधान केले आहे. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वच थरांतून त्यांचा निषेध केला जात आहे. याशिवाय, संस्कृतच्या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत चुकीचे लिखाण केले आहे. गायकवाड नावाच्या लेखकाने ही मोठी चूक केली आहे. ही चूक तत्काळ सुधारली पाहिजे.’’ यावेळी, बाळ घाटगे, फत्तेसिंह सावंत, चंद्रकांत पाटील, सुनीता पाटील, शिवराजसिंह गायकवाड, उमेश देवकर, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुवर्णा मिठारी, सुधा सरनाईक, अनिता जाधव, लता जगताप, पूजा पाटील उपस्थित होते. 

दाखल्यांसाठी अधिकारी नेमा
मराठा समाजाच्या दाखल्यांचे (आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग) सोप्या पद्धतीने वितरण करावे. दाखले काढण्यासाठी गर्दी होणार आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा. स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावेत, असे आवाहनही सकल मराठा समाजाने या वेळी केले.

Web Title: Sakal Maratha Samaj demand