सकल मराठा समाजाची राज्य समिती नियुक्त

सुनील पाटील
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कोल्हापूर - 'मराठा समाजाच्या विविध मागण्यांसदर्भात सरकारने आता आमच्यासोबत चर्चा करावी,'' असे आवाहन मराठा समाज महागोलमेज परिषदेत समन्वय समितीने केले. क्षत्रिय मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने येथे राज्यातील सर्व मराठा समाज प्रतिनिधींची महागोलमेज परिषद आज झाली. या परिषदेत सकल मराठा समाजाची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. आता येथून पुढील काळात मराठा समाजातील विविध प्रश्‍नांवर सरकारसोबत हीच समन्वय समिती चर्चा करण्यासाठी तयार असेल, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

गेल्या वर्षभरात राज्यात सर्वत्र मराठा क्रांती मूक मोर्चे काढण्यात आले. लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या मराठा समाजातील नागरिकांनी अत्यंत शिस्त आणि शांततेत हे मोर्चे काढले. हे मोर्चे काढताना प्रत्येक मराठा नागरिकाने या मोर्चाचे नेतृत्व केले. त्यामुळे, मोर्चाद्वारे केलेल्या मागण्यांबाबत चर्चा कोणासोबत करावयाची? असा प्रश्‍न सरकारकडून वारंवार विचारला जात होता. सरकारसोबत कोणी तरी चर्चा करणे हे समाजाच्या दृष्टीने आवश्‍यक होते. त्यामुळे आजच्या महागोलमेज परिषदेत 25 ते 30 समन्वयकांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीत जिल्हा आणि तालुका पातळीवर मराठा मोर्चासाठी योगदान देणाऱ्या मावळ्यांचा समावेश करून अंतिम राज्यस्तरीय समिती निश्‍चित केली जाणार आहे. त्यानंतर या समितीमार्फत मराठा समाजाबाबतचे निर्णय घेतले जातील. परस्पर समाजाच्या नावावर यापुढे कोणालाही कोणताही निर्णय घेता येणार नाही, तसेच कोणतेही आंदोलन करता येणार नाही, असेही या वेळी जाहीर करण्यात आले.

परिषदेत खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'महाराष्ट्रात मराठ्यांचा खदखदणारा असंतोष मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडला आहे. राज्यात शांततेत आणि शिस्तबद्धरीत्या लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. आज मराठ्यांत फूट पडल्याची चर्चा होते. ही चर्चा होतेच कशी असा प्रश्न आहे. मराठ्यांच्या उन्नतीसाठी एकी हाच पर्याय आहे. मराठ्यांच्या फुटीची भाषा आजपासून बंद करा. मराठा समाज एकत्र येत आहे आणि विविध विषयांवर चर्चा करतो आहे. शाहू महाराजांनी आरक्षण दिले तोच विचार घेऊन राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले. हातात तलवार घेऊन लढणाऱ्या मराठ्यांच्या अभूतपूर्व शिस्तीचे दर्शन या मोर्चानी दिले. मात्र मोर्चे निघाल्यानंतर अनेक महिने आपण एकत्र आलो नाही आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. नव्याने एकत्र आलेल्या मराठ्यांनी आता वेळ आणि योगदान देणाऱ्या लोकांची एक समिती करायला पाहिजे. यामध्ये कोणत्याही पुढाऱ्याला घेऊ नका; पण तयार होणारी समिती सर्व क्षेत्रांतील अभ्यास करून सरकारसमोर त्याचा एक मसुदा ठेवू शकेल.''

दिलीप पाटील, ऍड. संजीव भोर-पाटील, रवींद्र काळे (औरंगाबाद), माउली पवार (सोलापूर), आबासाहेब पाटील (पुणे), प्रा. जयंत पाटील (कोल्हापूर) आदींचीही या वेळी भाषणे झाली.

गोलमेज परिषदेतील महत्त्वाचे ठराव -
- मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
- ऍट्रॉसिटीचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करावी
- शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे
- शेतीला हमीभाव व अखंड मोफत वीज मिळावी
- सरकारने शेतीसाठी सक्षम आयात, निर्यात धोरण राबवावे
- डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा
- कर्नाटक सीमाप्रश्‍न त्वरित सोडावावा
- सीमावासीयांच्या मागे मराठा समाज ठाम राहील
- मराठा समाजासाठी आचारसंहिता तयार करावी
- मराठा महिलांच्या संरक्षण, सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत
- सकल मराठा समाज व मराठा क्रांती या नावाने कोणीही व्यक्ती व संघटनांनी परस्पर कार्यक्रम राबवू नये
- मराठा तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणे

Web Title: sakal maratha society state committee selection