खराब रस्त्यांची जबाबदारी ठेकेदारांवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर -  शहरातील खराब रस्त्यांचे वृत्त व त्यांची दुरवस्था झालेली छायाचित्रे "सकाळ'मधून प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाला आहे. अगदी अलीकडे पावसाळ्यापूर्वी केलेले शहरातील सुमारे चौदा रस्ते एका पावसाळ्यातच वाहून गेल्यानंतर आणि "सकाळ'ने वास्तव छायाचित्रांद्वारे वाचा फोडल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हे रस्ते करणाऱ्या आठ ठेकेदारांना नोटिसा बजावून या खराब रस्त्यांची जबाबदारी त्यांच्यावरच सोपविली असून आजपासून हे खराब रस्ते दुरुस्त करण्याच्या कामाला सुरवात झाली.

शहरातील बसंत-बहार चित्रमंदिरकडे जाणारा सायबा हॉटेलसमोरील रस्ता, साळोखेनगर - चव्हाण कॉलनी रस्ता, दाभोळकर कॉर्नर, पर्ल हॉटेल ते वृषाली हॉटेल, लाड चौक ते झूम प्रकल्प, रेल्वे फाटक ते भास्करराव जाधव, रेल्वे फाटक ते जनता बझार रस्ता, मंगेशकरनगर ते कामगार सोसायटी, फोर्ड कॉर्नर लक्ष्मीपुरी, परीख पूल, उमा टॉकीज ते आझाद चौक हे रस्ते खराब झाले आहेत. लाखो रुपयांचा खर्च झाला; पण एका पावसाळ्यातच हे रस्ते खराब झाले. काही ठिकाणी पाण्याची तळी साचत असल्याने आणि त्याकडे डोळेझाक झाल्याने हे रस्ते खराब झाले. वेळीच लक्ष दिले असते आणि रस्त्यावर साचणाऱ्या सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली असती तर कदाचित हे रस्ते खराब झाले नसते.

प्रशासनाचे कमालीची अनास्था, ठेकेदाराची नफेखोर वृत्ती यामुळे हे रस्ते खराब झाले होते. पावसाळ्यानंतर लगेच हे रस्ते दुरुस्त होतील, अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला.

"पॅचवर्क'ही सुरू
"सकाळ'ने खराब रस्त्यांची अवस्था वास्तवदर्शी छायाचित्रांतून दाखविल्यानंतर झोपी गेलेले प्रशासन जागे झाले आणि या खराब रस्त्यांना ठेकेदारांनाच जबाबदार धरत रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. आजपासूनच या कामांना प्रारंभ झाला. शुक्रवार गेट पोलिस चौकी ते पंचगंगा तालीम या रस्त्याचे काम आजपासून सुरू झाले. तसेच टेंबलाई मंदिर ते टेंबलाई नाका या रस्त्यावरही पॅचवर्कच्या कामांना प्रारंभ झाला.

Web Title: sakal news impact in kolhapur