तात्पुरती मलमपट्टी नको; ठोस कृती हवी! 

विठ्ठल लांङगे
शनिवार, 23 जून 2018

शहरातील चितळे रस्ता, माळीवाडा, कापडबाजार, मोची गल्ली, अडते बाजार, गंज बाजार, शहाजी रस्ता भागात फेरीवाले व पथारीवाल्यांचाच बाजार भरतो. नियमांचे उल्लंघन होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातर्फे होणारी कारवाई म्हणजे तात्पुरती मलमपट्टी ठरते. त्यावर, ठोस उपाययोजना झाल्याखेरीज शहरातील वाहतूक कोंडी सुटणार नाही, तसेच व्यापारही टिकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनतर्फे आज मांडण्यात आली.

नगर- शहरातील चितळे रस्ता, माळीवाडा, कापडबाजार, मोची गल्ली, अडते बाजार, गंज बाजार, शहाजी रस्ता भागात फेरीवाले व पथारीवाल्यांचाच बाजार भरतो. नियमांचे उल्लंघन होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातर्फे होणारी कारवाई म्हणजे तात्पुरती मलमपट्टी ठरते. त्यावर, ठोस उपाययोजना झाल्याखेरीज शहरातील वाहतूक कोंडी सुटणार नाही, तसेच व्यापारही टिकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनतर्फे आज मांडण्यात आली. 

कापडबाजारासह शहरातील काही भागांत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी "पे अॅन्ड पार्क'चा प्रस्ताव मांडला आहे. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध असून, काहींनी आज "सकाळ'कडे तीव्र भावना व्यक्त केल्या. सर्वांच्याच दुर्लक्षामुळे शहरातील बाजारपेठ अखेरच्या घटका मोजत असल्याचे मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केले. कापडबाजारातील रस्ता रुंदीकरणास व्यापाऱ्यांनी 30 वर्षांपूर्वी विनामोबदला जागा दिली. त्या जागेवर वाहन उभे करण्यासाठी शुल्क आकारणी केल्यास हा व्यापाऱ्यांवर अन्याय ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रश्‍नाकडे कोणाचेही लक्ष नसल्याची भावनाही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कापडबाजारातील रस्ता रुंदीकरणासाठी विनामोबदला जागा देणाऱ्या व्यापाऱ्यांवर प्रशासनाने अन्याय करू नये. त्याऐवजी ज्या ठिकाणी "नो हॉकर्स झोन' घोषित केले आहे, तेथे कारवाई करावी. बाजारपेठेला अवकळा येणार नाही, याची काळजी घ्यावी, असे मत महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशन सदस्य संजय गुगळे यांनी व्यक्त केले.

कापड बाजारात एक-दोन दिवस कारवाई करून उपयोग नाही. त्याऐवजी अतिक्रमण हटाव मोहीम कायमस्वरूपी राबविण्याची गरज आहे. तसेच पुन:पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई केल्यास फेरीवाले, पथारीवाल्यांचा प्रश्‍न सुटेल.  असे राहुल निकम यांनी व्यक्ते केले.

बाजारपेठेतील सर्वच रस्ते अरुंद आहेत. बाजारात रस्ता रुंदीकरणाची गरज आहेच, तत्पूर्वी चुकीच्या पद्धतीने वसुली करण्याचा हा प्रयत्न आहे. तोही चुकीचाच ठरेल. अशा पद्धतीने पैसे वसूल करू नयेत असे मत मोहसीन शेख यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: sakal news impact in nagar