कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

जीर्णोद्धार कामाच्या गुवणत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. चांगल्या दर्जाचे काम व्हावे यासाठीच सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येईल. सुशोभीकरण झाल्यानंतर त्याची जबाबदारी मात्र महापालिकेने घ्यावी. 
- राजेश क्षीरसागर, आमदार 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर तसेच पुतळ्याची ऐतिहासिक माहिती सांगणारा स्थानिक इतिहास यावर आधारित शिल्प असावीत. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जीर्णोद्धाराच्या कामास घटस्थापनेपासून सुरवात करावी, अशा सूचना आज महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या. आर्किटेक्‍ट सुरत जाधव यांनी सध्या केलेल्या आराखड्यात बैठकीत मांडलेल्या सूचनांचा समावेश करावा, असे सांगण्यात आले. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आठ दिवसानंतर पुन्हा बैठक घेण्याचे ठरले. अध्यक्षस्थानी महापौर हसीना फरास होत्या. 

शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून शासनाने 90 लाख रुपये मंजूर केले आहेत. हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी शिवाजी महाराज पुतळा जीर्णोद्धार समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी महापौरांची निवड करण्यात आली. सुशोभीकरणाच्या कामास सुरवात करण्यापूर्वी सर्वपक्षीच्या कार्यकर्त्यांचे तसेच जाणकारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आज महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बैठक बोलाविण्यात आली होती. सुरवातील आर्किटेक्‍ट सुरत जाधव यांनी सुशोभीकरणाच्या आराखड्याबाबत माहिती दिली. 

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ""छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामात कोणीही राजकारण करू नये. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांची मते ऐकून घेऊन हे जीर्णोद्धाराचे काम व्हावे, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करावी व त्यांनी काम पूर्ण करावे.'' 

शरद तांबट म्हणाले, ""शिवाजी चौकातील पुतळ्याला ऐतिहासिक परंपरा आहे. पूर्वी या ठिकाणी इंग्रज अधिकारी विल्सन यांचा पुतळा होता. या पुतळ्याला डांबर फासत फोडण्यात आला. यात दोन महिला स्वातंत्र्यसैनिकही सहभागी होत्या आणि त्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. त्यामुळे पुतळ्याचे सुशोभीकरण करत असताना या सर्व गोष्टींचा विचार करून इतिहासावर आधारित शिल्प असावीत.'' 

गणी आजरेकर म्हणाले, ""कोल्हापूरचा इतिहास सांगणारी शिल्प या ठिकाणी असावीत. सुशोभीकरणामध्ये करण्यात येणारे विद्युतीकरण चांगल्या दर्जाचे करावे. दिलीप देसाई यांनी सुशोभीकरण करत असताना होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचाही विचार करावा, असे मत मांडले.'' 

आर. के. पोवार म्हणाले, ""सुशोभीकरण करत असताना वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता पुतळा हालवावा लागणार की पुतळ्याची जागा न बदलता हे काम करण्यात येईल, या संदर्भातही गांभीर्याने विचार करावा.'' कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण म्हणाले, ""शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांचा पुतळा हा स्वातंत्र्यसैनिकांनी बसविला आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास तसेच शिवाजी महाराजांचा इतिहास या ठिकाणी मांडावा. दीपक गौड यांनी सर्वांना विश्‍वासात घेऊन जीर्णोद्धाराचे काम करावे.'' सदानंद कोरगावकर, बाबा पार्टे, आदिल फरास यांनीही आपली मते मांडली. 
महापौर हसीना फरास यांनी, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेचे संपूर्ण सहकार्य राहील. त्याचप्रमाणे याची जबाबदारीही महापालिका घेण्यास तयार असल्याचे सांगितले. 

या वेळी परिवहन समिती सभापती नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, चंद्रकांत यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर, मधुकर नाझरे आदी उपस्थित होते. उपमहापौर अर्जुन माने यांनी आभार मानले. 
 

Web Title: sakal news kolhapur news chhatrapati shivaji maharaj statue news