दहावीच्या पालकांनो, तुमच्यासाठी...

SSC-Study
SSC-Study

सातारा - दहावीला पाल्य आहे... अभ्यासक्रम बदलला आहे... कसे होणार मुलांचे... चांगले गुण मिळतील का... ही सारी चिंता सोडा आता. दहावीचा अभ्यासक्रम बनविणारे तज्ज्ञ लोक तुम्हाला भेटणार आहेत. पालकांची भूमिका नेमकी काय असावी, यासह बरेच काही तुम्हाला सांगणार आहेत...

‘सकाळ’च्या पुढाकाराने माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण, व्यावसायिक विकास संस्थेमार्फत सातारा, वाई, फलटण, कऱ्हाड येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 

चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. गत वर्षापर्यंत येणारा गुणांचा फुगवटा आता आटला जाणार आहे. अभ्यासक्रम बदलल्याने, परीक्षा पध्दतीतही आमूलाग्र बदल झाले आहेत, या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार, याची सर्वाधिक भीती त्यांच्या पालकांना लागून राहिली आहे. कृतिपत्रिका म्हणजे काय, अभ्यासक्रमात नेमके काय बदल झाले आहेत, त्यादृष्टीने विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा करून घ्यावा लागेल, हेच पालकांना उमगत नाही. खासगी क्‍लासेसही विद्यार्थ्यांना पुरेसा आधार देऊ शकत नाहीत, अशी भीती पालकांना आहे. 

ही सर्व भीती काढून टाकण्यासाठी, बदललेल्या अभ्यासक्रमातही पाल्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सुजाण पालकांना मार्गदर्शनाची नितांत आवश्‍यकता आहे. ती पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने गत जुलै महिन्यापासून ‘दहावी अभ्यासमाला’ हे सदर सुरू केले आहे. त्यातून राज्यस्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करत असतात. शिवाय, तितक्‍याच तोडीचे मार्गदर्शन जिल्ह्यातील दहावीच्या पालकांना मिळावे, यासाठी ‘सकाळ’ने माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण, व्यावसायिक विकास संस्थेमार्फत पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. साताऱ्यातील कार्यशाळेचे उद्‌घाटन सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे हे करतील. यावेळी ‘डीआयईसीपीडी फलटणचे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर हे मार्गदर्शन करतील. 

तसेच वाई, फलटण, कऱ्हाड येथेही यापुढे कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. 

कार्यशाळेत असा मिळेल प्रवेश...
साताऱ्यात शनिवारी (ता. ११) सकाळी ११ ते दोन वाजेपर्यंत शाहू कलामंदिरात होणारी कार्यशाळा सातारा शहर व तालुक्‍यातील दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी व दहावीच्या शिक्षकांसाठी मोफत असणार आहे. त्यासाठी पालकांनी ८३०८५०२३०० या मोबाइल क्रमांकावर पाल्याचे नाव, शाळेचे नाव व तालुका या बाबी टाईप करून टेक्‍स्ट अथवा व्हॉट्‌सॲपवर मेसेज करावा. प्रथम नोंदणीला प्राधान्य राहणार आहे.

राज्यस्तरीय तज्ज्ञ तुमच्यासाठी...
दहावीचा अभ्यासक्रम तयार करण्यात मोलाचा वाटा असणारे महाराष्ट्र राज्य अभ्यास संशोधन मंडळातील कार्यरत तज्ज्ञ प्रत्यक्षात तुमच्याशी संवाद साधणार आहेत. पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पना, त्यांची उद्दिष्टे, परीक्षा पध्दती, मूल्यमापन याची सविस्तर माहिती देतील. तसेच सर्व शंकांचे निरसन करतील. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासात निश्‍चित मदत होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com