चिवसेनेने चिव चिव बंद करावी - सक्षणा सलगर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर - ‘चिवसेनेने खोपटात राहून चिव चिव करू नये, हिंमत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतींशी रस्त्यावर उतरून त्यांनी सामना करावा,’ अशा शब्दांत युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी अजित पवार यांच्यावर झालेल्या टीकेचा समाचार घेतला.

कोल्हापूर - ‘चिवसेनेने खोपटात राहून चिव चिव करू नये, हिंमत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवतींशी रस्त्यावर उतरून त्यांनी सामना करावा,’ अशा शब्दांत युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी अजित पवार यांच्यावर झालेल्या टीकेचा समाचार घेतला.

सरकारला सत्तेची मस्ती
सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. राम कदम हे मुलींना पळवून आणण्याची भाषा करतात. अशा वृत्तीला कोल्हापुरी चपलेने झोडले पाहिजे, असे सक्षणा सलगर म्हणाल्या.

एल्गार परिषदेच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘अजित दादांवर बोलण्याची हिंमतच कशी झाली. हा सामान्यांचा पक्ष आहे. सैराटमधील झिंगाट परश्‍यासारखा हा पक्ष नाही. मातीत काम केलेल्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. चिवसेनेने खोपटात बसून चिव चिव करू नये. कुणामध्ये किती हिंमत आहे ते पाहूच. आधी आदित्य ठाकरेंचे काय ते पाहा. खोपटातून चिव चिव करण्यापेक्षा उस्मानाबादला येऊन दुष्काळ काय आहे तो पाहा.’’

खोटी आश्‍वासने आणि तरुणांना भुरळ घालून भाजप सरकार सत्तेत आले. एक लाख ७७ हजार जागा रिक्त असताना केवळ चारशे जागा भरल्या गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात पोषक वातावरण आहे.

- संग्रामसिंह कोते-पाटील, प्रदेशाध्यक्ष

जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, ‘‘युवकांचा हा एल्गार कोल्हापुरात सुरू झाला आहे. कोल्हापूरचे दोन्ही खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील.’’

ते एका बाजूला दुसरे ‘दादा’ असताना त्यांच्यापेक्षा आमच्या बाजूचे ‘दादा’ अधिक मजबूत आहेत. ते मुख्यमंत्री होतील की नाही, हे माहीत नाही. आमचे दादा मात्र निश्‍चितपणे मुख्यमंत्री होतील.

- शशिकांत शिंदे , आमदार

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘येत्या निवडणुकीत सहा आमदार आणि दोन्ही खासदार हे राष्ट्रवादीचेच असतील. राफेलचे भूत मोदींना गाडल्याशिवाय राहणार नाही. सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही.’’

Web Title: Sakshna Salgar comment