...आणि वॉचमनमधील कलाकाराचा पुनर्जन्म झाला !

...आणि वॉचमनमधील कलाकाराचा पुनर्जन्म झाला !

मिरज - हातात अप्रतिम कला, पण पोटाचा प्रश्न मोठा होता. त्यासाठी कलेची मदत होईना, मग हाती  धरली काठी आणि थांबले कारखान्यांच्या गेटसमोर. वॉचमनचे काम पत्करले. पोटाचा प्रश्न मिटला, पण  कलेची ऊर्मी कायम होती. हात शिवशिवत होते. एका उद्योजकाने हात पुढे केला आणि त्यांच्यातील कलाकौशल्याला पुन्हा भरारी मिळाली. जणू पुनर्जन्मच मिळाला. कुपवाड येथील सलीम शेख याची ही कथा.

साठीच्या दशकात चित्रकलेतील इंटरमिजीएट परीक्षा दिलेल्या शेख यांच्याकडे कला होतीच. लाकूड दिसले की त्यातली कलाकृती नजरेत साकारू लागते. कधी अवाढव्य हत्ती साकारतो, तर कधी लांबलचक मगर. कधी इवलशी चिमणी तर कधी गदाधारी हनुमंत. आजवर त्यांनी अशा हजारो कलाकृती साकारल्या. त्यांच्या या कलेने अनेकांचे दिवाणखाने- कार्यालये सजली. मात्र मात्र त्यातून चरितार्थ भागत नव्हता. मग त्यांनी आपल्यातील कलाकाराला मुरड  घालत मिळेल ती नोकरी करायचा निर्णय घेतला. वयोमानामुळे त्यांना मिरज औद्योगिक वसाहतीत वॉचमन म्हणून काम करावे लागले. जगण्याच्या या रहाटगाडग्यात त्याच्यातील कला झाकोळून गेली. त्यांनीही ते वास्तव स्वीकारले. 

एकेदिवशी त्यांच्या कलेला दाद देणारा असामी भेटला. सुदर्शन ॲल्युमिनिअम कंपनीचे रौनक शहा यांना यांना त्यांच्यातील या गुणांची माहिती मिळताच त्यांनी त्यांना वॉचमनचे काम बंद करून  आपल्या कंपनीत काष्ठशिल्पांचे काम करायला येण्याचे निमंत्रण दिले. मासिक वेतनही ठरवले. आंधळ्याला दोन डोळे मिळावेत अशी शेख यांची अवस्था झाली. त्यांनी  तत्काळ ही नवी नोकरी पकडली. नोकरी कसली हा तर त्यांचा छंदच. वर मनासारखा पगार. जीविका आणि उपजीविका एकच होते तेव्हा जगणे आनंददायी होते, याचा प्रत्यय ते घेत आहेत. ट्रकभर लाकडे धुंडाळत ते कलाकृतींची जुळणी करीत आहेत.  उतारवयात त्यांच्यातील कलाकाराचा जणू पुनर्जन्मच झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com