समरजितसिंह घाटगे म्हणाले, युतीचा मीच उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

कागल - ‘आता एका मोठ्या रणभूमीत मी उतरतोय. कागल विधानसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना आणि आरपीआय युतीचा मीच उमेदवार आहे. शंका घ्यायचे काही कारण नाही. आपण हे युद्ध जिंकणार आहोत,’ असा आत्मविश्वास म्हाडा (पुणे)चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला.

कागल - ‘आता एका मोठ्या रणभूमीत मी उतरतोय. कागल विधानसभा मतदारसंघासाठी भाजप, शिवसेना आणि आरपीआय युतीचा मीच उमेदवार आहे. शंका घ्यायचे काही कारण नाही. आपण हे युद्ध जिंकणार आहोत,’ असा आत्मविश्वास म्हाडा (पुणे)चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. शाहू साखर कारखान्याची सभा झाल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘१९९८ नंतर २१ वर्षांनी येणाऱ्या रणभूमीत आपण बूथ लावतोय. याआधी बूथला पाठिंबा देण्याचे काम केले. १०-१५ हजार लोकांचा गट असल्याचे काही लोक म्हणतात. आता हा गट कितीचा आहे, हे येत्या काळात सिद्ध करायचे आहे. त्यासाठी सर्वांचा आशीर्वाद मला हवा आहे. मी तुमच्याकडे मत नाही, तर तुमचा आशीर्वाद मागतोय. कोणावर टीकाटिप्पणी करण्यासाठी नव्हे, तर स्व. राजेसाहेबांच्या सिद्धांताप्रमाणे विकासाच्या मुद्द्यावर काम करण्यासाठी मी या रणात उतरतोय. यासाठी मला मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे पाठबळ आहे.

आपण हे युद्ध जिंकणार आहोत. फक्त किती विक्रमी मतांनी युद्ध जिंकणार आहे, यावर सर्वांनी निर्णय घ्यायचा आहे. येत्या १३ तारखेला कागल, गडहिंग्लज, उत्तूर मतदारसंघाच्या परिवर्तन संकल्प यात्रेचा प्रारंभ करत आहे. कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ याचा प्रारंभ होणार आहे. या परिवर्तन संकल्प यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे.’ 

‘तसेच १६ तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे. त्यानंतर १७ पासून नवोदिता घाटगे यांचा हळदी - कुंकू कार्यक्रम व माझ्या परिवर्तन संकल्प यात्रा भेटी होणार आहेत. याद्वारे लोकांपर्यंत आपण केलेले कार्य पोचवू, तसेच येत्या पाच वर्षांत आपण काय कार्य करणार हेही सांगू. याआधी कोणाला २४० महिने संधी दिली. आता शाहू महाराजांच्या जनक घराण्याला ६० महिने संधी द्यावी,’ असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SamarjeetSingh Ghatge comment