समरजितसिंह घाटगे "म्हाडा'चे अध्यक्ष 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

कोल्हापूर - पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची सोमवारी नियुक्ती झाली. या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या नियुक्तीने कागल तालुक्‍याला काही महिन्यांपासून लागून राहिलेली लाल दिव्याची प्रतीक्षा संपली. 

कोल्हापूर - पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची सोमवारी नियुक्ती झाली. या पदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या नियुक्तीने कागल तालुक्‍याला काही महिन्यांपासून लागून राहिलेली लाल दिव्याची प्रतीक्षा संपली. 

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्या वेळी त्यांना या पदावर नियुक्तीचे आश्‍वासन दिले होते. नगरपालिका निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही झाल्या; पण घाटगे यांची निवड झाली नव्हती, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. नगरपालिका निवडणुकीत कागल नगरपालिकेत इतिहासात पहिल्यांदा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली "कमळ' चिन्हावर 20 पैकी नऊ नगरसेवक विजयी झाले होते. त्यानंतरच्या जिल्हा परिषद निवडणुकीतही पाचपैकी दोन गटांत भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. जिल्हा परिषदेत एकही जागा त्यांना जिंकता आली नसली, तरी तालुक्‍यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवण्यात त्यांच्या गटाला यश आले होते. 

तालुक्‍यातील भाजपची ही घोडदौड एकीकडे सुरू असताना घाटगे यांची वर्णी कधी लागणार, याकडे तालुक्‍यासह जिल्ह्याच्या नजरा होत्या. आज सकाळी या संदर्भातील आदेश सरकारचे अवर सचिव गणेश जाधव यांनी काढला. पूर्वी या पदावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश काकडे होते. त्यांची मुदत 2014 मध्येच संपली. तेव्हापासून हे पद रिक्तच होते. घाटगे यांची नियुक्ती ही तीन वर्षांसाठी असेल, असे या आदेशात म्हटले आहे. 

राज्यात "म्हाडा'चे सात विभाग आहेत. यापैकी तीन विभाग हे मुंबईतच आहेत. पुणे, मराठवाडा, विदर्भ व कोकण असे चार अन्य विभाग आहेत. पुणे "म्हाडा'अंतर्गत कोल्हापूरसह सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांचा समावेश आहे. कमी किमतीत दर्जेदार घरे बनवून घेणे व त्यांचे वाटप हे "म्हाडा'चे मुख्य काम आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार 
या निवडीनंतर मुंबईत घाटगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, सुरेश हाळवणकर, हिंदूराव शेळके आदी उपस्थित होते. 

Web Title: Samarjit Singh ghatage MAHADA`s President