संभाजी भिडे म्हणतात, पंतप्रधानांचे 'हे' वक्तव्य चुकीचे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी बुद्धांवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदी यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले आहे. 

सांगली : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी बुद्धांवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदी यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले आहे. 

नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये भिडे हे सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील वक्तव्याचा समाचार घेतला. एबीपी माझा या वृत्तवाहीनीवर भिडे यांनी पंतप्रधानांवर टीका केल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेतील भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले होते, की भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला. भारत जगभरात नेहमीच एकजुटीचा आणि शांतीचा संदेश देत आला आहे. यावेळी मोदींनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा उल्लेख आवर्जुन केला. दरम्यान, भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला, या पंतप्रधान मोदी यांच्या याच वक्तव्यावर भिडे यांनी आक्षेप घेतला आहे. मोदी चुकीचे बोलले असल्याचेही भिडेंनी म्हटले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर बोलताना भिडे म्हणाले की, पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करु शकतो, ते काम आपलं आहे. देशाने जगाला बुद्ध दिला, पण बुद्ध हा काहीच उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजच पाहिजेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sambhaji bhide criticize narendra modi's statement