भाजपचा तंबू उंटाने उचललाय - संभाजी पवार

भाजपचा तंबू उंटाने उचललाय - संभाजी पवार

सांगली - जिल्ह्यात राजकीय बजबजपुरी झाली आहे. भ्रष्टाचार बोकाळला असून नैतिक राजकारण पायदळी तुडवले जात आहे. अशा गंभीर स्थितीत पुन्हा एकदा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. लढणे हा माझा पिंड आहे आणि मी पुन्हा शड्डू ठोकून मारुती चौकातून लोकांसाठी संघर्ष करणार आहे, अशी भूमिका माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

गेल्या चार वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या श्री. पवार यांनी पुन्हा मैदानात उडी घेणार असल्याचे संकेत देतानाच भाजपलाही कोपरखळ्या हाणल्या. पत्रकारांनी भाजपमधील अंतर्गत संघर्षावर विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी ‘‘मी भाजपला साडेचार वर्षांपूर्वी सावध केले होते, उंटाला तंबूत घेऊ नका.  त्यांनी माझे ऐकले नाही. आता उंटाने तंबू उचलला आहे. आता भाजपला ते कळाले असेल,’’ असा टोला खासदार संजय पाटील यांचे नाव न घेता लगावला. 

ते म्हणाले,‘‘वसंतदादा मुख्यमंत्री असताना मी एकाधिकारशाही आणि जनतेच्या प्रश्‍नांसाठी मारुती चौकातून आवाज उठवला होता. त्या जोरावर चारवेळा आमदार झालो. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे हाच माझा पिंड आहे. आता राजकारणात पुरती बजबजपुरी झाली आहे. भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. त्याविरुद्ध लढण्याची  कुणाची धमक नाही. त्यामुळे पुन्हा एकदा शड्डू ठोकून उभा राहिलोय. मी दहा-पंधरा गावांतून फिरलो, तुम्ही  पुन्हा मैदानात या, असे लोक सांगताहेत. माझ्यासाठी  सर्व दरवाजे उघडे आहेत. मी कुस्तीला कधीही तयार आहे. मला राजकीय आखाड्याची गरज नाही. लोकांसाठी रस्त्यावरच्या आखाड्यात नेहमीच मी शड्डू ठोकत आलो आहे. राजकीय भूमिकेसाठी काही काळ वेळ हवा आहे. एक महिनाभरानंतर सारे चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यातील जुन्या लोकांशी भेटून सर्वमत आजमावत आहे. धनगर आरक्षणाच्या लढाईत साथ द्या, असेच निमंत्रण गोपीचंद पडळकर यांनी दिले आहे.’’

भाजप आहे कुठे?
संभाजी पवार म्हणाले,‘‘जुन्या नेत्यांना दूरदृष्टी असते. त्यांनी सांगितलेले कळायला वेळ लागतो. मी साडेचार वर्षांपूर्वी सांगितले होते, ते आता भाजपला कळाले असेल. सत्ता नावालाच भाजपची आहे. चेहरे कुणाचे आहेत? मूळ भाजप आहे कुठे? कोट्यवधीच्या निधीचे फलक लावून कुठे विकास होतो का?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com