सनासाळीवस्ती जगतेय आदिवासींचे जीवन

सनासाळी (ता. जावळी) - रुग्णाला दवाखान्यात पोचवताना अक्षरशः जिवंतपणी अशा मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.
सनासाळी (ता. जावळी) - रुग्णाला दवाखान्यात पोचवताना अक्षरशः जिवंतपणी अशा मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

भिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली तरी जावळी तालुक्‍यातील सनासाळी वस्तीमधील लोक आजही आदिवासींसारखे जीवन जगत आहेत. 

प्राथमिक सोयी-सुविधा नसल्याने येथील लोक जिवंतपणी मरणयातना भोगत आहेत.

पाचगणीपासून काही अंतरावर असणाऱ्या रुईघर गावाची सनासाळी ही २० ते २५ कुटुंबांची वस्ती भिलार वॉटर फॉलच्या पायथ्याशी डोंगररांगेत वसली आहे.

ग्रामपंचायत प्रशासन, लोकप्रतिनिधी केवळ मतदानापुरता येथील ग्रामस्थांचा उपयोग करतात. सोयी-सुविधांबाबत मात्र हात आखडता घेत आहेत. समस्यांचे ओझे घेऊन जीवन कंठीत असणारे येथील लोक केवळ जगायचे म्हणून जगत आहेत. रस्ता नसल्याने या लोकांना पावलोपावली समस्यांचा सामना करावा लागतो. लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण, कुडाळी नदीवर पूल नसल्यामुळे वस्तीपर्यंत पायी जावे लागते. रुग्णांना डालग्यात अथवा लाकडी शिडीवर न्यावे लागत आहे. त्यामुळे वृद्ध रुग्णांना दवाखान्यात पोचवताना तर अगदी मरणासन्न यातना सोसाव्या लागत आहेत. काही वृद्ध तर दवाखान्यात जाण्याअगोदरच रस्त्यात प्राण सोडतात. 

पिण्याच्या पाण्याची सोय ग्रामस्थांनी स्वतःच केली आहे. रस्ता अद्यापही या वाडीच्या दृष्टीस पडलेला नाही. रस्त्याअभावी हे गाव अजूनही पारतंत्र्याचा अनुभव घेत आहे.

सभोवताली देशी-विदेशी पर्यटक, २१ व्या शतकाकडे झेपावलेली पिढी उंच डोंगरावरून आमच्याकडे पाहते. आमचे मन खिन्न होते. सारे पुढारले. परंतु, आम्ही मात्र आजही पारतंत्र्याचेच जीणे जगतोय.
- तुकाराम शेडगे, ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com