नायब तहसीलदारांना मारण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

वांगी (सांगली) : वाळूचोरी करणाऱ्या एका ट्रॅक्‍टरला पकडल्यानंतर वाळू तस्करांनी गस्तीवरील नायब तहसीलदार व्ही. वाय. भिसे यांच्या मोटारीला ट्रॅक्‍टर धडकवून जिवे मारण्याचा प्रयत्न शनिवारी (ता. 24) पहाटे तीनच्या दरम्यान केला. त्यानंतर त्यांनी पळ काढला. पोलिसांनी ट्रॅक्‍टरमालक शेखर नाथाजी मोहिते, चालक संतोष गुजले यांना आज (ता. 25) अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेली व समजलेली माहिती अशी, की प्रांताधिकारी मनोज साळुंखे यांनी नायब तहसीलदार व्ही. वाय. भिसे यांच्या नेतृत्वाखाली येरळा काठावर गस्तीपथक नेमले. भिसे हे सहायक जे. एन. लाड यांना घेऊन रात्रभर फिरत होते. पहाटे सव्वादोन वाजता येरळा नदीतून वाळू भरून सुसाट वेगाने येणारा ट्रॅक्‍टर (एमएच 10 एवाय 3030) अडवून चौकशी केली.

चालकाने नाव न सांगता त्यांच्याशी मग्रुरीची भाषा करत येरळेतील वाळू चोरून घेऊन जात असल्याचे सांगितले. तेव्हा भिसे यांनी त्याला ट्रॅक्‍टर कडेगाव प्रांत कार्यालयात नेण्यास सांगितले. मात्र ट्रॅक्‍टरचालकाने ट्रॅक्‍टर जोराने पुढे नेला. भिसे यांनी मोटारीतून त्याच्या पुढे जाऊन त्याला थांबण्याची सूचना केली. मात्र, त्याने न थांबता ट्रॅक्‍टर भिसे यांच्या दिशने वळवला. प्रसंगावधान ओळखून भिसे व सहकारी बाजूला झाले. हा ट्रॅक्‍टर मोटारीवर (एमएच 14 बीके 1054) आदळला. त्यानंतरही त्याने ट्रॅक्‍टर मागे घेऊन पुन्हा कडेपूरच्या दिशेने दामटला. मोटारीचे नुकसान झाल्यानंतरही भिसे यांनीही पुन्हा त्याचा पाठलाग केला. मात्र ट्रॅक्‍टरचालक ट्रॅक्‍टर घेऊन पसार झाला होता. या प्रकाराची सकाळपासून तालुक्‍यात उलटसुलट चर्चा सुरू झाली.

पोलिसांनी ट्रॅक्‍टरमालक शेखर नाथाजी मोहिते (वय 34) आणि चालक संतोष गुजले (वय 23) दोघांना अटक करून ट्रॅक्‍टरही जप्त केला आहे.

Web Title: Sand Mafia tried to kill officer in Sangli