वाळूची फुटणार कोंडी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सातारा - वाळूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले होते. पण, येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील १९ ठिय्यांचे वाळू लिलाव होणार असून, त्यासाठी पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे वाळूची कोंडी फुटणार असून, दरही कमी होण्यास मदत होणार आहे. 

सातारा - वाळूच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे बांधकाम व्यावसायिक अडचणीत आले होते. पण, येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील १९ ठिय्यांचे वाळू लिलाव होणार असून, त्यासाठी पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे वाळूची कोंडी फुटणार असून, दरही कमी होण्यास मदत होणार आहे. 

वाळू लिलावाला पर्यावरण विभागाने चाप लावल्याने यावर्षी पावसाळा संपला तरी लिलाव झाले नाहीत. पर्यायाने चोरटी वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती. यातून वाळूचे दर ब्रासला सात ते आठ हजारांवर गेले होते. साडेतीन ब्रासचा एक डंपर ३५ हजार रुपयांपर्यंत विकला जात होता. याचा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला होता. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या घरे व बंगल्यांच्या बांधकामासाठी सर्वसामान्यांच्याही खिशाला चाट पडत होती. 

एकूणच वाळूने सोन्याचा दर गाठल्याने अनेकांनी बांधकामे थांबविली होती. पण, आता महसूल प्रशासनाने येत्या आठवडाभरात वाळूचे लिलाव करण्याची तयारी केली आहे. ज्या ठिकाणी पाण्याबाहेर वाळू आहे, अशा १९ ठिय्यांच्या लिलावाला पर्यावरण विभागाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये माण, वाई, फलटण येथील प्रत्येकी एक आणि कऱ्हाड आणि सातारा तालुक्‍यातील १६ ठिय्यांचा समावेश आहे. सध्या शासनाच्या विविध कामांसाठी लागणाऱ्या वाळूसाठी यातील काही ठिय्ये राखीव ठेवले जाणार आहेत. त्यासाठी बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या प्रमुखांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन निर्णय होणार आहे. साधारण तीन ते चार ठिय्ये शासनाच्या कामांसाठी राखीव ठेवले जाण्याची शक्‍यता आहेत.

चोरटी वाळू शहराकडे
सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. महामार्गावरून मोठमोठे डंपरद्वारे ताडपत्री झाकून वाळू शहराकडे आणली जाते. याकडे मात्र, महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. आता तर वाळूचे लिलावच होणार असल्याने चोरट्या वाळूउपसा व वाहतुकीला आळा बसणार आहे. 

Web Title: sand rate