वाळू तस्करांची आगळीक, काय केले पाहा...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

वांगी (ता. कडेगाव) येथे वाळू तस्करांनी महसूल पथकास धक्काबुक्की करत व जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी देत शिवीगाळ करून पकडलेले अवैध वाळूचे तीन ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पळवून नेले.

कडेगाव,ता. 14 : वांगी (ता. कडेगाव) येथे वाळू तस्करांनी महसूल पथकास धक्काबुक्की करत व जातीवाचक गुन्हा दाखल करण्याची धमकी देत शिवीगाळ करून पकडलेले अवैध वाळूचे तीन ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पळवून नेले.याप्रकरणी संजय साळुंखे, शेखर मोहिते, सोन्या लोंढे (तिघे रा.वांगी) यांच्या विरोधात चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.ही घटना आज पहाटे तीन च्यासुमारास घडली. याबाबत चिंचणीचे मंडळ अधिकारी संजय कदम यांनी फिर्याद दिली. 
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्‍यात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी तहसीलदार डॉ.शैलजा पाटील यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांनी बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्याना लगाम घालण्यासाठी तालुक्‍यात रात्री पाहऱ्यासाठी महसूल विभागाची पथके तैनात केली आहेत. आज पहाटे तीनच्या सुमारास वांगी येथील आरफळ कॅनॉलजवळ महसूल पथकाचे कर्मचारी पहारा करत असताना संशयित आरोपी संजय साळुंखे,शेखर मोहिते व सोन्या लोंढे हे त्यांच्या ताब्यातील वाळूने भरलेले तीन ट्रॅक्‍टर घेऊन जात असताना.चिंचणीचे मंडळ अधिकारी संजय कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही वाहने अडवली व त्यानंतर ही वाहने तहसील कार्यालय कडेगाव येथे घेऊन चला असे सांगितले. यावेळी संशयित आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून महसूल अधिकारी कदम यांच्यासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली व दमदाटी, शिवीगाळ करून तुमच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करतो अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला.तसेच वाळूने भरलेले तिन्ही ट्रॅक्‍टर, ट्रॉली व एकूण 18 हजाराचा मुद्देमाल चोरून पलायन केले. याबाबत चिंचणी- वांगी पोलीस ठाण्यात संजय कदम यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी हे करीत आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. \

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sand Smugglers stolen tracters seized by govt. officials