वाळू चोरीस प्रतिबंध करणाऱ्या तलाठ्यास बेदम मारहाण 

चंद्रकांत देवकते
शुक्रवार, 29 जून 2018

तालुक्यातील अर्जुनसोंड व लांबोटी परिसरातील  नदीपात्रातून वाळूचोरी होत असताना मोबाईलमध्ये शुटिंग काढणाऱ्या तलाठ्यास 7 ते 8 जणांनी लाथाबुक्क्या व खोऱ्याच्या दांडक्याने  मारहाण करून शासकीय कामात अडथळा करीत त्यांच्याकडे असलेली हस्तलिखित उतारे व शासकीय कागदपत्राची बॅग पळवून नेल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोहोळ : तालुक्यातील अर्जुनसोंड व लांबोटी परिसरातील  नदीपात्रातून वाळूचोरी होत असताना मोबाईलमध्ये शुटिंग काढणाऱ्या तलाठ्यास 7 ते 8 जणांनी लाथाबुक्क्या व खोऱ्याच्या दांडक्याने  मारहाण करून शासकीय कामात अडथळा करीत त्यांच्याकडे असलेली हस्तलिखित उतारे व शासकीय कागदपत्राची बॅग पळवून नेल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरापूर, भोयरे, लांबोटी, अर्जुनसोंड येथील गावचा कार्यभार असलेले तलाठी अशोक रामचंद्र राठोड हे बुधवारी 27 जून रोजी कामानिमित्त अर्जुनसोंड येथे आले असता त्यांना वाळू चोरीबद्दल मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 12 च्या सुमारास लांबोटी व अर्जुनसोंड सिना नदीपात्रात पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी भरदिवसा दुपारी तीन टॅक्टरमध्ये वाळू चोरून भरत असल्याचे दिसले. त्यावेळी राठोड यांनी ट्रॅक्टरचालकांना विचारणा केली असता तुम्ही कोण, कोण तलाठी, आम्ही कोणाला ओळखत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली . दरम्यान त्याबाबत तलाठी राठोड यांनी फोटो शुटींग घेण्यास सुरवात केली. मात्र, वाळू चोरी करणाऱ्यांनी राठोड यांचा मोबाईल घेऊन दगडावर आपटून फोडून टाकला . 

तसेच सात ते आठ लोकांनी त्यांना लाथा बुक्यांनी व खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. व त्यांची हस्तलिखित उताऱ्याची व शासकीय कागदपत्राची बॅग पळवून नेली. याप्रकरणी हरीदास सुखदेव पवार, प्रदिप लहू पवार, सचिन भास्कर पवार, नागेश हरिदास पवार, सर्व रा. पवार वस्ती, वडवळ यांच्यावर मारहाण व शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू राठोड करत आहेत.

Web Title: sand stolen attack on Talathi