नामी शक्कल! वाळूची आलिशान वाहतूक! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कवडीमोलाने विक्री होणारी वाळू आज चांगलाच भाव खात आहे. त्यामुळे वाळूचोरांना सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र, पोलिसांनी वाळूचोरांवर धडक कारवाई सुरू केल्याने चोर वाहतुकीसाठी नामी शक्कल लढवीत आहेत. अकोल्यात वाळूचोरांनी अलिशान मोटारीचा वाळू वाहतुकीसाठी वापर केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. 

akole

अकोले : टेम्पो, ट्रक वा ट्रॅक्‍टरमधून होणारी वाळूवाहतूक आता आलिशान मोटारीतून सुरू झाली आहे. महसूल व पोलिस प्रशासनाला चकमा देण्यासाठी वाळूचोरांनी ही वेगळीच शक्कल लढवली आहे. अशाच प्रकारे आलिशान मोटारीतून वाळूवाहतूक करताना अकोले पोलिसांनी आज पहाटे कळस येथील प्रवरा नदीच्या पुलावर एकास पकडले. भाऊसाहेब रामनाथ साळवे (रा. मंगळापूर, ता. संगमनेर), असे त्याचे नाव आहे. अर्धा ब्रास वाळू व मोटार, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 
 

आवश्‍य वाचा चला अंधाराच्या गावा

वाळूसह मोटार पकडली 
याबाबत हवालदार चंद्रकांत सदाकाळ यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, कळस येथील प्रवरा नदीच्या पुलावर आज पहाटे साडेतीनच्या सुमारास संशयावरून पोलिसांनी मोटार अडविली. तपासादरम्यान मोटारीत अर्धा ब्रास वाळू आढळून आली. पोलिसांनी आरोपी भाऊसाहेब साळवे यास ताब्यात घेतले. मोटार व वाळू जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा अन्‌ "त्यांचा' ठावठिकाण मिळाला 

akole 2

एकाविरुद्ध गुन्हा दाखल 
दरम्यान, कळस येथे मध्यरात्री पोलिसांना एका ट्रॅक्‍टरमधून (एमएच 17 4512) वाळूवाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी एक ब्रास वाळू व ट्रॅक्‍टर ताब्यात घेतला. वाळूचोरीप्रकरणी अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (रा. कळस, ता. अकोले) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत पोलिस नाईक बाळू गोंदे यांनी फिर्याद दिली. 

हेही वाचा जामखेड बाजार समितीला ठोकले टाळे 

 

तपास सुरू आहे 
मोटारीतून वाळूवाहतूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या गुन्ह्यात आणखी किती वाहने मिळतील, हे तपासाअंती समोर येईल.

- अरविंद जोंधळे, पोलिस निरीक्षक, अकोले 
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand stolen from a motor vehicle in Akole