दंड ठोठावूनही ठेकेदारांची वाळूचोरी

शांताराम पाटील
सोमवार, 17 एप्रिल 2017

इस्लामपूर - इस्लामपूर व साखराळे येथे १८ वाळू ठेकेदारांनी अवैधपणे वाळूसाठा केल्यावर महसूल विभागाने त्यांच्यावर २१ कोटी २१ लाख ५० हजार ७६० रुपयांचा दंड ठोठावला होता. दंड ठोठावूनही या ठेकेदारांनी महसूल विभागाला ‘फाट्यावर मारत’ त्याची परस्पर चोरून विक्री केली. यात महसूल विभागातील तलाठी, मंडल अधिकारी व तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी वाळू ठेकेदारांना मदत केली आहे. कोट्यवधी रुपयांचा वाळूसाठा गायब करण्यात लाखो रुपयांची बोली महसूल कर्मचाऱ्यांनी लावून मोठा हात मारला आहे. आता संबंधित तलाठी व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महसूल विभाग आपल्या दावणीला बांधला आहे या आविर्भावात गेले कित्येक वर्षे वावरणाऱ्या वाळू ठेकेदारांनी प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणे पाकीट पोच करून कृष्णा नदीकाठ पोखरून काढला. परवाना शेकडो ब्रास वाळूउपशाचा आणि लाखो ब्रासचे उत्खनन हे गेल्या काही वर्षांतील सूत्र ठरलेले आहे. यात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप, महसूल विभागाचा कानाडोळा व ठेकेदारांची मनमानी कारणीभूत आहे. वाळवा तालुक्‍यात कृष्णा नदीकाठावर तलाठी व मंडल अधिकारी म्हणून नेमणूक मिळावी यासाठी अनेक जण देव पाण्यात घालतात. याला कारण या नदीपात्रात मिळणारी कोट्यवधी रुपयांची दर्जेदार वाळू आहे. नेमणूक झाल्यानंतर त्या सजात असलेले तलाठी, मंडल अधिकारी हे ठेकेदार व महसूल प्रशासनातील ‘दलाल’ होतात. प्रत्येकाची किंमत हे तलाठीच ठरवतात. त्यामुळे बेसुमार वाळू उपशाकडे संबंधित यंत्रणा गांधारीची भूमिका घेते. २०१६ मध्ये तालुक्‍यातील काही ठेकेदारांनी इस्लामपूर शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळूसाठे केले. याची माहिती महसूल प्रशासनाला काही नागरिकांनी दिली. तत्कालीन तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी संबंधित बेकायदेशीर वाळूसाठे जप्त केले. २१ कोटी २१ लाखांचा दंड ठोठावला. या वेळीही तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अनेक वाळूसाठ्यांचा जप्ती पंचनामा महसूल प्रशासनाला सादर केला नाही. संगनमताने ती वाळू ठेकेदारांना लंपास करायला लावली. कागदोपत्री अनेक त्रुटी ठेवल्या. कारवाईच्या नोटिसा संबंधित प्लॉटमालकांना न देता ठेकेदारांच्या हातात दिल्या. त्यामुळे अनेक प्लॉटमालकांना आपल्या रिकाम्या प्लॉटमध्ये वाळूसाठा केला आहे व त्याच्यावर कारवाई झाली आहे याची सूतराम कल्पनासुद्धा नव्हती. संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतरही मंडल अधिकारी व तलाठ्यांनी अनेक उचापती करत रजा घेत सुटीवर जाण्याचा खटाटोप केला. हा सर्व प्रकार महसूल प्रशासनाच्या लक्षात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना  सविस्तर अहवाल तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आला. इस्लामपूरचे मंडल अधिकारी विठ्ठल पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबन केले. रजेच्या काळात वाळू ठेकेदारांच्या पैशावर परदेशवारी केलेले तलाठीसुद्धा आता रडारवर आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी हात ओले करून घेतले त्यांची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: sand theft Contractors