सोलापूर: सिद्धेश्‍वर वनविहारातून चंदनाची चोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी माहिती दिली. रात्री चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांनी तोडलेल्या झाडांची पूर्ण वाढ झालेली नाही. अंदाजे 15 ते 20 झाडे तोडण्यात आली आहेत. वनविहारात चोरट्यांनी तोडलेले चंदन आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. अशाप्रकारची चोरी टाळण्यासाठी वनविभाग दक्ष आहेच, नागरिकांनीही यासंदर्भात काही माहिती असेल तर आम्हाला कळवावे. माहिती देणाऱ्यांना शासनाकडून बक्षीस देण्यात येईल. 
- संजय माळी, उपवनसंरक्षक 

सोलापूर : सिद्धेश्‍वर वनविहारात सोमवारी पहाटे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 15 ते 20 झाडं तोडून चंदनाची चोरी करण्यात आली आहे. वनविभाग आणि पोलिसांच्या श्‍वानपथकाने घटनास्थळाची पाहणी केली. चोरट्यांचा शोध चालू असून घटनास्थळावरून चंदनाचे तुकडे, कुऱ्हाड, करवत, दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. 

चंदनाची चोरी होत असल्याची माहिती कळाल्यानंतर नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा, सदस्य पप्पू जमादार, शुभम अक्षंतल यांनी रविवारी रात्री सिद्धेश्‍वर वनविहाराच्या दिशेने धाव घेतली. रात्री 12.30च्या सुमारास वनविहारात एके ठिकाणी बॅटरीचा प्रकाश दिसला. काही अंतरावर जाऊन पाहिले असता चोरटे करवतीने चंदनाची झाडे तोडताना दिसले. आवाज आल्याने चोरट्यांनी चंदनाच्या तुकड्यांसह करवत, कुऱ्हाड, कुदळ व इतर साहित्य टाकून धूम ठोकली. घटनेची माहिती उपवनसंरक्षक संजय माळी यांना कळविण्यात आली. त्यांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, विजापूर नाका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजीव भोसले आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले. अंधारामुळे काहीच दिसत नव्हते. सोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्याला सुरवात झाली. 
श्‍वानपथकाला पुन्हा बोलाविण्यात आले. श्‍वान मॉंटी हे वनविहार परिसरातील कुष्ठरोग वसाहत परिसरात जाऊन थांबले. चोरटे तेथून पळून गेल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. या परिसरातील चोरट्यांचे एक दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले आहे. या वेळी उपवनसंरक्षक माळी यांच्यासह सहायक वनसंरक्षक रमेश नागटिळक, हरिश्‍चंद्र वाघमोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, शिवानंद हिरेमठ आदी उपस्थित होते. 

नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी माहिती दिली. रात्री चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांनी तोडलेल्या झाडांची पूर्ण वाढ झालेली नाही. अंदाजे 15 ते 20 झाडे तोडण्यात आली आहेत. वनविहारात चोरट्यांनी तोडलेले चंदन आणि दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. अशाप्रकारची चोरी टाळण्यासाठी वनविभाग दक्ष आहेच, नागरिकांनीही यासंदर्भात काही माहिती असेल तर आम्हाला कळवावे. माहिती देणाऱ्यांना शासनाकडून बक्षीस देण्यात येईल. 
- संजय माळी, उपवनसंरक्षक 

चंदन अधिकृतरीत्या लागवड करण्यास, तोडण्यास बंदी नाही पण सरकारी जागेतील चंदनाची चोरी कायद्याने मोठा गुन्हा ठरते. गेल्या 15 दिवसांपासून आम्ही सिद्धेश्‍वर वनविहारातील चोरीच्या प्रकरणावर लक्ष ठेवून होतो. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. चंदनात म्हैसूरनंतर सोलापूरचा क्रमांक लागतो. आपल्याकडे नैसर्गिकरीत्या चंदनाची झाडे मोठ्या प्रमाणात आली आहेत. वनविभागासह नागरिकांनीही दक्ष राहायला हवे. 
- भरत छेडा,  प्रमुख, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल

Web Title: sandal wood thief in solapur