नव्या - जुन्याचा संगम साधत बांधलेले असे आहे सुंदर घर

सुधाकर काशीद
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

या घरात स्वतंत्र खोल्या नाहीत. दिवाणखाना, स्वयंपाकघर, डायनिंग हॉल, व्हरांडा हे सारे आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवतही एकमेकांत बेमालूम मिसळून गेले आहेत.

 

कोल्हापूर - घर बांधायचं ठरवल्यावर जुळणी सुरू होते, ती पैशांबरोबर सिमेंट, वाळू, खडी, सळया, विटा, फरशी, रंग, दिवे आणि घर सजावटीच्या वस्तूंची. संदीप आणि माधुरी अंकले या जोडप्याचीही त्यांचं घर बांधताना अशीच जुळणी सुरू झाली; मात्र त्यांची जुळणी थोडी वेगळी होती. त्यांनी ठिकठिकाणी फिरून जुन्या विटा, जुने दगड, विहिरीचे बांधीव कठडे, जुन्या वाड्याचे दरवाजे, खिडक्‍या, सज्जे, कठडे गोळा केले आणि नव्या-जुन्याचा संगम साधत एक सुंदर घर उभे केले. घराच्या दारासमोर चाफा लावला. आज चाफा पूर्ण वाढला आहे आणि रोज त्यांच्या दारात फुलांचीच रांगोळी घालतो आहे. 

राजाराम तलाव आणि उजळाईवाडी यांच्यामध्ये उज्ज्वल हाउसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत संदीप आणि माधुरी अंकले यांचे घर आहे. घराला नाव नाही, पण घरावर प्लॉट नंबर ६ ची पाटी ठळक लावली आहे. आणि सहा नंबर प्लॉटवरचं सुंदर घर अशीच त्यांची ओळख झाली आहे.  हे दोघेही आर्किटेक्‍ट; त्यामुळे त्यांनी फक्त घरात मुबलक वारा आणि प्रकाश राहील यांवरच लक्ष केंद्रित केले आणि घराची एकेक वीट ते रचू लागले. घरासाठी वापरलेल्या बहुतेक विटा जुन्या वाड्यांच्या. अनेकजण म्हणतात, नवे घर बांधताना जुने काही वापरायचं नाही; अर्थात त्यामुळे बांधकामाचा खर्च वाढल्याशिवाय राहत नाही; पण या दोघांनी जुन्या विटांत पन्नास-साठ पावसाळे अनुभवून आलेली भक्कमता ओळखून जुन्याच विटांना प्राधान्य दिले.

घराच्या अंगणात पेव्हिंग ब्लॉक घालून अंगणाला मिळणारा प्राणवायू बंद करायची अलीकडच्या काळातली श्रीमंत फॅशन; पण या दोघांनी चक्क अंगणातल्या जमिनीवर फरशीसारख्या विटाच अंथरल्या. या विटांतून एक सुंदर भाजीव मातीतले विटांचे अंगण तयार झाले. घरातही फार महागातली फरशी न वापरता साधी फरशी त्यांनी वापरली. अंगणातल्या झाडांना दगडाचा वर्तुळाकार कठडा तयार केला. घराच्या दरवाजावरही जुने दगडी कठडे उभे केले.

या घरात स्वतंत्र खोल्या नाहीत. दिवाणखाना, स्वयंपाकघर, डायनिंग हॉल, व्हरांडा हे सारे आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवतही एकमेकांत बेमालूम मिसळून गेले आहेत. घराच्या परिसरात पडणारे सर्व पाणी जमिनीखाली मोठ्या टाकीत त्यांनी साठवले आहे. टाकी भरली, की जादा झालेले पाणी बोअरिंग मध्ये मिसळून जाण्याची सोय आहे.

घरातील सांडपाण्यावर अंगणातील बाग फुलते आणि आंबा, पेरू, चिकू, नारळ, सीताफळ या झाडांना बारा महिने हिरवेगार ठेवते. या घराचे नवे-जुनेपण प्रख्यात नाट्यकर्मी अतुल पेठे यांनाही आकर्षित करून गेले. आणि चक्क त्यांनी किमया या पुस्तकाचे अभिवाचन या घराच्या अंगणात बसून केले. या घराच्या भिंती, अंगण, दारातला चाफा, दगडी कठडे याची किनार अतुल पेठे यांच्या असे पूर्ण शब्दाला मिळाली आणि या घराची सुंदरता अधिकच वाढली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sandeep And Madhuri Ankale Special House