सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी संदीप आवटी

सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी संदीप आवटी

सांगली - महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी अपेक्षेनुसार संदीप आवटी यांची निवड झाली. तर समाजकल्याण सभापतिपदासाठी पुन्हा स्नेहल सावंत यांना संधी मिळाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी नसीमा नाईक यांची निवड झाली. चमत्कार घडणार, असा दावा करणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी ऐन वेळी माघार घेतल्याने या सर्व निवडी बिनविरोध झाल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली निवडी झाल्या. 

सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी होती. यावेळी स्थायी समिती सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपकडून ऐन वेळी सुरेश  आवटींचे पुत्र संदीप यांचे नाव पुढे आले. आधी गणेश माळी आणि गजानन मगदूम यांच्यात चुरस होती. त्यांच्या नावावर कोअर कमिटीत एकमत झाले नाही. त्यामुळे कोअर कमिटीतही उशिरापर्यंत खलबते झाली आणि संदीप आवटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

त्यानंतर सभापतिपदासाठी संदीप आवटी यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर यांनी अर्ज दाखल केला होता. आवटींचे नाव निश्‍चित झाल्याने भाजपचे काही सदस्य नाराज होते, त्याचा फायदा घेऊन चमत्कार करण्याचा दावा आघाडीने केला होता. प्रत्यक्षात निवडणुकीवेळी सरगर यांनी माघार घेतल्याने आवटींची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

समाजकल्याण सभापतिपदी स्नेहल सावंत कायम 
समाजकल्याण समिती सभापतिपद विद्यमान सभापती स्नेहल सावंत यांनी सलग चौथ्यांदा मिळवले. या पदासाठी भाजपच्या सोनाली सागरे इच्छुक होत्या. पण, नेत्यांनी सौ. सावंत यांनाच मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांनी अर्ज दाखल केला होता.त्यांनीही एकूण चित्र पाहून माघार घेतली. त्यामुळे ही निवडही बिनविरोध झाली.

महिला व बालकल्याण सभापतीपदी नसीमा नाईक 
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या नसीमा नाईक यांचीही अपेक्षेनुसार निवड झाली. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या आरती वळवडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनीही माघार घेतल्याने श्रीमती नाईक यांची बिनविरोध निवड झाली.
तीनही नूतन सदस्यांचा भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, सुरेश आवटी, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी स्थायी समितीचे मावळते सभापती अजिंक्‍य पाटील, गटनेते युवराज बावडेकर, प्रकाश बिरजे, रवी बाबर यांच्यासह भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार म्हणाले, ‘‘विधानसभेच्या तोंडावर या निवडीबद्दल उत्सुकता होती. जी नावे पक्षाने निश्‍चित केली ती बिनविरोध विजयी झाले. गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची पोचपावती आहे.’’ 

राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान व काँग्रेसचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी साथ दिल्याने निवडी बिनविरोध झाल्या. गेल्याच महिन्यात सांगलीत महापुराचे अरिष्ट कोसळले होते. त्यावेळी पूरग्रस्तांच्या सहकार्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले. ते म्हणाले, ‘पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्या होत्या. मात्र कुणीही नाराज नाही. प्रत्येकाला संधी मिळणार ही खात्री आहे. भाजपमध्ये योग्य मूल्यमापन होत असते.’ 
- शेखर इनामदार,
प्रदेश उपाध्यक्ष, भाजप

महापुराच्या पार्श्‍वभूमीवर सभापती निवडी विरोध न करता एकमताने  साधेपणाने पार पडल्या, याबद्दल विरोधकांचे आभार. पक्षात कोणी नाराज नाही. विधानसभा निवडणुकीतही असेच एकत्रित काम करू. 
- सुधीर गाडगीळ,
आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com