
सांगली जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर व कर्नाटक सीमावर्ती तालुक्यांतील लोकांसाठी पद्मभूषण वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाचा मोठा आधार आहे.
सांगली जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर व कर्नाटक सीमावर्ती तालुक्यांतील लोकांसाठी पद्मभूषण वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाचा मोठा आधार आहे. शहराच्या मध्यवर्ती जागेत सुमार 30 एकर क्षेत्राची प्रशस्त जागा असलेले हे रुग्णालय आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र या रुग्णालयाची नेहमीच परवड होत आहे. रुग्णालयाची उपेक्षा संपवण्यासाठी काय करता येईल याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
"सिव्हिल' हे केवळ गरीबच नव्हे, तर सर्वस्तरांतील रुग्णांसाठी आधार आहे. आजही या रुग्णालयात दिवसाकाठी सरासरी 20 ते 25 मोठ्या आणि छोट्या स्वरुपाच्या 40 ते 50 शस्त्रक्रिया होत असतात. बाह्य रुग्ण विभागात 100 ते 1500 तर आंतरुग्ण विभागात सरासरी पाचशेंवर रुग्ण उपचार घेत असतात. वर्षाकाठी सुमारे साडेतीन लाखांवर रुग्ण उपचार घेतात. यातून या रुग्णालयाची गरज आणि व्याप्ती लक्षात येते. मात्र हे
रुग्णालय सुसज्ज आणि सर्वसोयींनी युक्त करतानाच आधुनिक उपचाराच्या सुविधांची गरज आहे. विशेषतः सुपरस्पेशालिटी गटातील मेंदू, हृदय, बालरुग्ण, प्लास्टीक सर्जरी, मानसिक विकार आदी वैद्यकीय शाखांच्या विस्ताराबाबत सातत्याने मागणी आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे तीनशेंवर डॉक्टर्स या रुग्णालयांशी संलग्न असतात. त्यातून इथल्या मनुष्यबळाचा व्याप लक्षात यावा. या साऱ्या जमेच्या बाजूंचा विचार करता पन्नास वर्षांपूर्वी लोकसंख्येचा विचार करून उभारलेल्या या रुग्णालयासाठी काय व्हायला हवे याचा हा लेखाजोखा.
विस्ताराची योजना
शंभर खाटांची प्रसूतिगृहाची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे 60 ः 40 टक्के अनुदान मंजूर आहे. सध्याच्या जुन्या इमारतीमधील शंभर खाटांची इमारत धोकेदायक ठरल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्यामुळे आता त्यालगत पाचशे खाटांची स्वतंत्र इमारत उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर आहे. या दोन्ही योजना मार्गी लागल्यानंतर रुग्णालयातील खाटांची संख्या हजारांवर जाईल. याबाबत स्थानिक सर्वच लोकप्रतिनिधींच्या राजकीय इच्छाशक्तीची तसेच जनआंदोलनाची गरज आहे.
मागण्या आणि अपेक्षा
देणग्यांमधून विकास निधी उभा राहू शकतो
सिव्हिलसाठी शहरातील सजग नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करून या रुग्णालयाच्या दैनंदिन कारभाराला गतिमान करता येणे शक्य आहे. सध्या ही समिती केवळ कागदावरच आहे. रुग्णालयासाठी स्थानिक स्तरावर देणग्यांमधून विकास निधी उभा राहू शकतो त्यातून रुग्णालय परिसराचा विकास शक्य आहे. खासदार-आमदारांनी त्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे.
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच
सुविधांची गरज आहे
रुग्णालयाच्या अंतर्गत स्वच्छतेत गेल्या काही वर्षांत चांगली सुधारणा झाली आहे. मात्र परिसरात बांधकामामुळे अस्वच्छता आहे. त्याबाबत संबंधितांना सूचना केल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छतागृहांपासून अन्य निवास व सुविधांची गरज आहे. याबाबतचे प्रस्तावही शासनाकडे सादर आहेत.
- डॉ. नंदकिशोर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल रुग्णालय
सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत
सिव्हिलच्या उर्वरित जागेचा वापर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी व्हायला हवा. एखाद्या संस्थेने जबाबदारी घेतली तर आम्ही त्यांच्यासाठी उद्यानातील रोपे तसेच नियोजनाची जबाबदारी घेऊ. या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.
- डॉ. विशाल चौगुले, आयुर्वेद पंचकर्म प्रॅक्टीशनर्स असोसिएशन
संपादन : युवराज यादव