लोकांना मूर्ख समजाल तर घरीच बसाल! (सांगली महापालिका निवडणूक)   

शेखर जोशी
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

भाजपचे जरूर अभिनंदन मात्र या आनंदाच्या क्षणीही विजयामुळे त्यांनी हुरळून जाऊन पुन्हा मागचे पुढे कराल तर जनक्रोधाचा धोका कायम आहे हे लक्षात ठेवा. असाच या सत्तांतरामागचा संदेश आहे.  

सांगली महापालिकेतील भाजपचा हा विजय केवळ भाजपच्या रणनीतीचा विजय असा घेतला गेला तर ती शुद्ध फसवणूक ठरेल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने महापालिकेत जो दळभद्री कारभार केला त्याच्या विरोधातली नागरिकांची ही तीव्र प्रतिक्रिया आहे. ती व्यक्त करण्यासाठी भाजपने काही चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले नव्हते तरीही लोकांनी ठरवून कामाची माणसे निवडत भाजपला सत्तेपर्यंत पोहोचवून ठेवले. या विजयाचा एका ओळीत अन्वयार्थ असाही आहे की भले तुम्ही कितीही आघाडीची व्यूहरचना करा दळभद्री टक्‍केवारीच कारभार कराल तर यापुढे घरातच बसाल...भाजपचे जरूर अभिनंदन मात्र या आनंदाच्या क्षणीही विजयामुळे त्यांनी हुरळून जाऊन पुन्हा मागचे पुढे कराल तर जनक्रोधाचा धोका कायम आहे हे लक्षात ठेवा. असाच या सत्तांतरामागचा संदेश आहे.  

सांगली हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला हा आता इतिहास झाला. तहहयात सत्तेचाही हा काळ संपला. लोक बदलाला इच्छुक असतात. फक्त त्यासाठी समोर संधी हवी असते. डॉ. देवीकुमार देसाई यांचा विजय किंवा महाआघाडीच्या सत्ताकाळ, अशी संधी मिळाली तेव्हा सांगलीकरांनी ते सिद्ध केलेय.

महापालिका झाल्यावर पहिली दहा वर्षे कॉंग्रेसचीच सत्ता होती. त्यानंतर येथे महाआघाडीच्या रुपाने राष्ट्रवादी, भाजपसह मित्र पक्षांनी एकत्र येऊन पहिले सत्तांतर 2008 मध्ये घडविले. पण महाआघाडीचा सत्तेत असताना जनता पक्ष झाला. अर्थात तेव्हा पराभूत झालेली कॉंग्रेस पुन्हा 2013 मध्ये सत्तेवर आली, आणि आता पुन्हा तिला पराभूत व्हावे लागले आहे. म्हणजे कॉंग्रेसला कारभार सुधारण्यासाठी येथील जनतेने दुसऱ्यांदा दिलेली संधी त्यांनी अक्षरश: गेल्या पाच वर्षांत मनमानी कारभार करून वाया घालवली आहे. कॉंग्रेसच्या दुर्दैवाने त्यांना अजीज कारचे नावाचे आयुक्‍त लाभले. त्यांच्याकाळात अनियंत्रित कारभार सत्ताधाऱ्यांनी केला. त्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले. जणू त्यांनी कॉंग्रेसच्या खच्चीकरणाचा जणू पायाच घातला.

कॉंग्रेसचे शहराचे एकहाती नेतृत्व दिवंगत नेते मदन पाटील यांच्याकडे होते. त्यांच्या जाण्याचाही फटका कॉंग्रेसला नक्‍की बसला आहे. त्याच बरोबर दुसरे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्याही नसण्याचा कॉंग्रेसला फटका थोडा फार बसला आहे. या दोन्ही नेत्यांच्या जाण्याने महापालिका क्षेत्रात नेता कोण हा कॉंग्रेसमोरचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न होता. पतंगरावांना देखील कॉंग्रेसचा महापालिकेतील कारभार पसंत नव्हता. काय बाजार चालवलाय असे ते अनेकदा जाहीरपणे म्हणायचे! आर. आर. पाटील यांनी फारसे महापालिकेत कधी लक्षच घातले नाही, अर्थात त्यांचीही कमतरता राष्ट्रवादीला भासली आहे. पण या सर्व गोष्टी सोडल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरी प्रश्‍नच महत्त्वाचे असतात. पण दुर्दैवाने या निवडणुकीत हे प्रश्‍नच गायब झाले होते. ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीने हेतूपूर्वक गायब केले.

भाजपनेही या मुद्द्यावर निवडणूक आणायचा प्रयत्न केला नाही. या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा स्टार प्रचारकांनी एकाही सभेत आमच्या पक्षाने महापालिकेत हे चांगले काम झाले आहे हे ठासून सांगायचे टाळले. तेच भाजपनेही केले. मात्र लोकांनी सत्तेतील लोणचे काढून टाकायचा निर्णय केलाच होता. अगदी भाजपमधील अशा प्रस्थापितांनाही लोकांनी धडा शिकवल्याचे दिसते. भ्रष्ट सत्तेविरोधातील हा जनक्रोध आहे. विकासाच्या अपेक्षेने केलेला हा हुंकार आहे. सत्तेच्या आनंदाच्या क्षणी भाजपच्या धुरंधरांनी तो समजून घ्यावा. अन्यथा...लोकांना मूर्ख समजाल तर घरीच बसाल, हाच संदेश सांगली मिरज आणि कुपवाडच्या नागरिकांनी दिला आहे

Web Title: sangali elections dont consider people as fool