रंगलाय सांगली महापौर, उपमहापौर निवडीचा खेळ...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

महापौर, उपमहापौर निवड एक दिवसावर येऊन ठेपली असताना भाजपच्या नाराज नगरसेवकांच्या फोडाफोडीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने युध्दपातळीवर संपर्क सुरु केला आहे. भाजपमधील नाराज सदस्य गोव्यातूनही आपल्याशी संपर्कात असल्याचा दावा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

सांगली : महापौर, उपमहापौर निवड एक दिवसावर येऊन ठेपली असताना भाजपच्या नाराज नगरसेवकांच्या फोडाफोडीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने युध्दपातळीवर संपर्क सुरु केला आहे. भाजपमधील नाराज सदस्य गोव्यातूनही आपल्याशी संपर्कात असल्याचा दावा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनीही आज आपल्या सदस्यांना व्हिप बजावला. त्यामुळे उद्या (ता. 6) कोणत्या घडामोडी घडणार याकडे लक्ष आहे.

महापौर, उपमहापौर निवडीसाठी शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता निवड सभा होणार आहे. भाजपकडून महापौरपदासाठी गीता सुतार, उपमहापौरपदासाठी आनंदा देवमाने यांनी अर्ज भरले आहेत. तर कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडून महापौरपदासाठी वर्षा निंबाळकर व मालन हुलवान, तर उपमहापौरपदासाठी योगेंद्र थोरात आणि मनोज सरगर यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील दोन उमेदवार शुक्रवारी (ता. 7) माघार घेणार आहेत. 

भाजपमध्ये महापौर, उपमहापौर उमेदवारीवरून नाराजी आहे. त्यावरुन कोअर कमिटीमध्येही फूट पडल्याची चर्चा आहे. याचा फायदा घेत कॉंग्रेस आघाडीने नाराज भाजप सदस्यांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून भाजपने अर्ज भरल्यानंतर नाराज इच्छुकांसह सदस्यांना गोवा सहलीला पाठवले आहे. त्यांच्यासोबत कोअर कमिटीचे नेते माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, युवानेते सुयोग सुतार हे स्वत: सदस्यांसोबत आहेत. मात्र तेथेही सगळे सदस्य गेलेले नाही. अजून दहा-बारा सदस्य सांगली, मिरजेत आहेत. त्यात अनेकजण नाराज आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये अजून धाकधूक आहे. 

आघाडीची फिल्डींग 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्तांतरासाठी दोन दिवस फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या नाराज सदस्यांपैकी काहींनी गोव्यातूनही संपर्क साधल्याचा दावा विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, बागवान यांनी केला. त्याचबरोबर आपल्या सदस्यांनाही त्यांनी व्हीप बजावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील व कॉंग्रेसनेते राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यामार्फतही प्रयत्न सुरू ठेवलेत. गुरुवारचा दिवस आणि शुक्रवारची सकाळ या कालावधीत घडामोडींना अधिक वेग येणार आहे. यात कितीजण आघाडीच्या गळाला लागणार त्यावर महापौर, उपमहापौर कोणाचा हे ठरणार आहे. 

भाजप सदस्य कोल्हापूरमार्गे थेट महापालिकेत येणार 

भाजपने सदस्यांच्या नाराजीचा दगाफटका बसू नये यासाठी गोवा सहलीला गेलेल्या 35 सदस्यांना उद्या गुरुवारी कोल्हापूरमध्ये आणण्याचे ठरवले आहे. तेथून शुक्रवारी सकाळी थेट निवड सभेत मतदानासाठी सभागृहात आणण्याचे नियोजन केले आहे. तर दहा नाराज सदस्यांनाही उद्या कोल्हापुरात एकत्र येण्याची सूचना केली आहे. त्यांनाही तेथूनच थेट महापालिकेत आणण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangali mayor election