`चाकण`च्या इमारतीला टाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

कुपवाड - वनीकरणासाठी आरक्षित भूखंडावर बांधकामाच्या गैरवापरावर अखेर औद्योगिक विकास महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. येथील नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिलने बळकावलेल्या जागेला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे लावले. महामंडळाची ही जागा असल्याचा फलकही लावला.  अन्य अतिक्रमित भूखंडांचे मोजमाप सुरू असून त्याबाबतही आठवडाभरात कारवाईचे सुतोवाच अधिकाऱ्यांनी केले. 

कुपवाड - वनीकरणासाठी आरक्षित भूखंडावर बांधकामाच्या गैरवापरावर अखेर औद्योगिक विकास महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. येथील नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिलने बळकावलेल्या जागेला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाळे लावले. महामंडळाची ही जागा असल्याचा फलकही लावला.  अन्य अतिक्रमित भूखंडांचे मोजमाप सुरू असून त्याबाबतही आठवडाभरात कारवाईचे सुतोवाच अधिकाऱ्यांनी केले. 

कुपवाड औद्योगिक वसाहतीतील चारशे एकर पैकी तब्बल ६५ एकर वनीकरणाच्या जागेवर अशी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. आजच्या बाजारभावानुसार या भूखंडाची किंमत सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये आहे. त्यातील पहिली कारवाई आज महामंडळाने केली. नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिलने ओ-एस-एम हा १४,१९२ चौरस मीटर (साडेतीन एकर) हा भूखंड वनीकरणासाठी घेतला. जानेवारी १९९७ मध्ये दहा वर्षांचा रितसर करारपत्र करण्यात आले.

ही जागा केवळ वृक्षारोपणासाठी देण्यात आल्याचा करारात स्पष्ट उल्लेख होता. मात्र त्या जागेवर अतिक्रमण करून इमारत उभी करण्यात आली. त्यामुळे महामंडळाने करारनामा नूतनीकरण केला नाही. गेल्या २१ सप्टेंबरला या जागेवरील अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली. तरीही अतिक्रमण न काढल्याने अखेर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज पंचनामा करून इमारतीला टाळे ठोकले. पक्की इमारत, स्वच्छतागृह, सुरक्षारक्षक गृह बेकायदा उभारले आहे. हा भूखंड औद्योगिक विकास महामंडळाचा असल्याचा फलकही आज लावण्यात आला. 

असा होतो भूखंड गिळंकृत
वनीकरणाच्या जागेवर अनेक बड्यांची फार्महाऊस, औद्योगिक-व्यावसायिक वापर, शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत. यातून वनीकरणाच्या जागा लाटण्याचा नवा फंडाच सुरू झाला आहे. 

वनीकरणासाठी जागा घ्यायची. मग त्यावर बांधकाम करायचे. अशा अतिक्रमणाची कबुली द्यायची. मग ते नियमित करण्यासाठी दंड  भरायचा. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आजवर  असे अनेक भूखंड ढापले आहेत. याचा शोध घेण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती हवी. अनेक उद्योजकांचेच पुढाऱ्यांचे हात यात गुंतल्याने ही चौकशी कडेवर जात नाही. सध्याच्या कारवाईवर या भूतकाळाची टांगती तलवार आहे. एमआयडीसीच्या आजच्या कारवाईने भूखंड लुटरूंना आळा बसेल असे चित्र निर्माण झाले आहे.

लुंकड यांचे ‘उद्योग’
उद्योजक प्रवीण लुंकड यांनी नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिलच्या नावे ही जागा घेतली. त्याठिकाणी बोटॅनिकल गार्डन उभी करण्याचा संकल्प केला. दरम्यानच्या काळात इमारत बांधून त्याचा खासगी वापरासाठी उपयोग केला. सध्या या जागेव प्रणव ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडचा फलक आहे. इमारतीला टाळे ठोकल्यानंतर अधिकाऱ्यांनी कृष्णा व्हॅली स्कूलला वापरण्यासाठी दिलेल्या मैदानाचीही पाहणी केली. केवळ क्रीडांगणासाठी दिलेल्या या जागेवर सध्या व्यासपीठ, व्यायामशाळा, चेंजिंग रूमचे बांधकाम आहे. त्याचाही अहवाल प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला आहे. 
 

Web Title: Sangali News Chakan Oil Mill building locked by Corporation officer