झेडपीतील ठाणेदारांना बसणार दणका; बदलीच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

सांगली जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच टेबलावर बसलेल्या ठाणेदारांना दणका मिळण्याची तयारी सुरु झाली आहे. येत्या 15 दिवसांत या ठाणेदारांच्या बदलीचा कार्यक्रम लागणार आहे.

सांगली ः जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच टेबलावर बसलेल्या ठाणेदारांना दणका मिळण्याची तयारी सुरु झाली आहे. येत्या 15 दिवसांत या ठाणेदारांच्या बदलीचा कार्यक्रम लागणार आहे. मार्च एंड आहे, कामांवर परिणाम होईल, अशी कोणतीही सबब चालू न देता ही प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला आहे.

जिल्हा परिषदेत प्रशासकीय मार्च सुरु होण्याआधी भूकंप होणार, असे संकेत मिळालेत. त्याची सुरवात मिरज पंचायत समितीत मंगळवारी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने झाली. या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी लागेल तर काहींना बदलीच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

दोन दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा निर्णय होईल. सोबतच, सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यकालाची माहिती संकलित करण्याचे काम सुरु झाले आहे. कुणी चेहरा लपवू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील पोपट पडळकर या निलंबित कर्मचाऱ्याने पंधरा वर्षे एकाच जागेवर काढली. त्याच्या विषयीच्या रकाण्यात "निरंक' शेरा मारून अहवाल दिला जात होता. वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करून अनेकांनी खुर्च्यांवर मक्तेदारी निर्माण केली. 

माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागात अशा लोकांची संख्या भरमसाठ आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या फायली अडवणुकीचा आता पंचनामा सुरु झाला आहे. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी त्याची सुरवात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या प्रकरणात कुणाची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट धोरण ठरले आहे. पेन्शनच्या फाईल का अडवल्या जात आहेत,

माध्यमिक शिक्षण विभागातील पदोन्नतीच्या फायलींना पाय का फुटत नाही, याची चौकशीही अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी सुरु केली आहे. या एकूण प्रकरणात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जोरदार लॉबिंग समोर येत आहे. ते लॉबिंग मोडून काढण्यासाठी बदलीचे हत्यार उपसण्यात येणार आहे. त्यात ठाणेदारांना दणका बसणार हे अटळ आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangali Zp officers will be transfer soon